जळगाव /जामनेर : लॉकडाऊन काळात मोहाडी, ता.जामनेर येथे एका शेतात मद्य पार्टी करणाऱ्या जळगावचे भाजप नगरसेवक, वाळूमाफिया, पोलीस कर्मचारी व शेतमालक यांच्यासह ९ जणांविरुध्द २० दिवसानंतर सोमवारी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर पोलीस ठाण्याचे हवालदार अरविंद भोजू मोरे यांनाच फिर्यादी करण्यात आले आहे.जळगावचे भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील (३२,रा.मयुर कॉलनी, पिंप्राळा), मुख्यालयाचे पोलीस कर्मचारी विनोद संतोष चौधरी, सुपडू मकडू सोनवणे (रा.४६, बांभोरी, ता.धरणगाव), बाळू नामदेव चाटे (४५, रा.मेहरुण), विठ्ठल भागवत पाटील (३३, रा.अयोध्या नगर), शुभम कैलास सोनवणे (२४, रा.मयुर कॉलनी, पिंप्राळा), अबुलैस आफताब मिर्झा (३२, रा.कासमवाडी), हर्षल जयदेव मावळे (३१, रा.अयोध्या नगर),दत्तात्रय दिनकर पाटील (३२, रा.मोहाडी, ता.जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या पार्टी प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेच्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.मोहाडी, ता.जामनेर येथे २१ एप्रिल रोजी दत्तात्रय दिनकर पाटील यांच्या शेतात मद्य पार्टी झाली होती. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
मद्यपार्टी: नगरसेवक,पोलिसासह ९ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:08 PM