जळगाव : रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेल पूनम परमिट रूम बीअर बारमधून चोरट्यांनी एक लाख ७४ हजार रुपयांच्या मद्याच्या बाटल्या लांबवल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा शहर पोलिसांनी उलगडा केला असून तस्लीम शेख मेहमुद (२० रा.गेंदालाल मिल) व राजकुमार मधुसूदन विश्वकर्मा (२२ रा. धनाजी काळे नगर) या दोन संशयितांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे़ त्यांच्याजवळून फक्त आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.रेल्वेस्थानक परिसरात चंद्रकांत खुशीराम अडवाणी (रा.एलआयसी कॉलनी) यांच्या मालकीचे हॉटेल पूनम परमिट रूम बियरबार आहे. लॉकडाऊनच्या काळात हा बीअरबार बंद होता. १२ जून रोजी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अडवाणी यांनी मद्य विक्रीसाठी बार उघडला़ त्यावेळी त्यांना एक्झॉस्ट फॅन काढलेले दिसले व त्या जागेतून चोरट्यांनी बारमध्ये प्रवेश करीत एक लाख ७४ हजार ८२० रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या मद्याच्या बाटल्या लांबविल्याचे त्यांना दिसून आले़ त्यानंतर याप्रकरणी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़