जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका रोज कमावून रोज खाणाऱ्या नागरिकांना बसला आहे. रोजगार बंद असल्यामुळे गोरगरीब नागरिकांची उपासमार होत आहे, अशा नागरिकांची पिंप्राळा-हुडको येथील अलिम शेख धावून आले आहे. १ लाख ८० हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ते करीत आहेत.
सध्या कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसेंदिवस बाधितांसह मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे रोजगार बंद आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांची उपासमार होत आहे. अशा नागरिकांना मदत करण्यासाठी अलिम शेख यांनी पुढाकार घेतला आहे. शेख यांचे किरकोळ किराणा मालाचे दुकान आहे. दरवर्षी ते गोरगरीब नागरिकांना मदत करीत असतात. मागील लॉकडाऊनमध्ये त्यांनी ४०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे त्यांनी १ लाख ८० हजार रुपयांच्या जीवनाश्यक वस्तू आणून ते गरजूंना वाटप करीत आहेत. अलिम शेख यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, इतरांनाही गरजूंच्या मदतीला धावून यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.