पहूरसह परिसरात अद्यापही नदी, नाले, धरणे, दमदार पावसाच्या अभावाने कोरडेठाक आहे. मात्र शुक्रवारी सकाळी हलक्या सरीचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. क्षारयुक्त पाऊस झाल्याने केळी, कपाशी, मका, उडिद, मूग याबरोबरच मिरची, वांगी, कारली आदी भाजीपाला पिकांच्या पानांवर पांढरे ठिपके आढळून आले. गवताच्या पानांवरही ठिपके आढळले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे.
क्षारयुक्त पावसाने पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होईल, या चिंतेत शेतकरी दिसून येत आहे. गवताच्या पानांवरही ठिपके असल्याने गुरांच्या खाण्यात चारा येत आहे. याचा परिणाम गुरांच्या आरोग्यावर जाणवतो का? याचीही काळजी शेतकरी घेत आहे. याविषयी शेतकरी तज्ज्ञ लोकांकडून माहिती जाणून घेत आहेत.
तसेच पिकांच्या उत्पादनावर याचा परिणाम होईल, अशा उलटसुलट चर्चांनी शेतकऱ्यांना कोड्यात टाकले आहे.
प्रतिक्रिया
कपाशी पिकासह वांगे, मिरची, कारले आदी भाजीपाला लागवड केली आहे. शुक्रवारी दुपारी शेतात गेल्यावर क्षारयुक्त पावसामुळे पानांवर पांढरे ठिपके निदर्शनास आले. या प्रादुर्भावाने चिंता निर्माण झाली.
अजय कडूबा चौधरी,
भाजीपाला उत्पादक
यासंदर्भात कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या मतानुसार सोडियमयुक्त पाऊस झाला आहे. किड, रोग किंवा कोणताही प्रादुर्भाव नाही व उत्पादकतेवर काही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता स्वच्छ पाण्याची फवारणी करावी किंवा जोरदार पावसाने पांढरे डाग स्वच्छ होतील.
-अभिमन्यू चोपडे,
तालुका कृषी अधिकारी,
जामनेर
240721\24jal_3_24072021_12.jpg
पहूरसह परिसरात क्षारयुक्त पाऊस झाल्याने केळीच्या पानांवर पडलेले पांढरे डाग.