लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध होऊनही तो खर्च होत नसल्यास नंतर निधी मागावा कसा, असा प्रश्न पडतो. जि.प.कडे मोठ्या प्रमाणात निधी पडून असल्याने जि.प.सह सर्वच यंत्रणांनी सोमवारपर्यंत विविध योजनांमधील कामांचे कार्यादेश द्या, अन्यथा राज्याच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर उघडे पडू, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती कार्यकारी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिसून आहे. दरम्यान, रोहित्र व ऑईलच्या मुद्यावरून वीज वितरणचे अधिकारी तर निधी खर्च होत नसल्याने जि.प. यंत्रणेला धारेवर धरण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, कार्यकारी समिती सदस्य आमदार शिरीष चौधरी, किशोर पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे, लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे विभागपमुख उपस्थित होते.
कोणत्याही कामासाठी जि.प. सक्षम नाही, ६३ कोटी शिल्लकजिल्ह्यासाठी ३७५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असला तरी तो खर्च होत नसल्याचे बैठकीत समोर आले. यात जि.प. कडे तर गेल्या वर्षाचा ६३ कोटींचा निधी शिल्लक असल्याचे सांगण्यात आल्याने सर्वच लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करीत जि.प.कडे यंत्रणा नसल्याने कोणत्याही कामाच जि.प. सक्षम नसल्याचे वारंवार आढळून आले आहे. त्यामुळे जि.प.कडे कामे न देता इतर यंत्रणांकडे कामे देण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
‘जि.प. अध्यक्षा ताई, तुम्ही तरी लक्ष द्या’
जि.प. ला दिलेल्या निधीतून कामे होत नाही व निधीही वेळेत खर्च होत नाही ही सर्वांचीच तक्रार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनीही मान्य केले. यासाठी ‘जि.प. अध्यक्षा ताई, तुम्ही तरी लक्ष द्या’, असे पालकमंत्री पाटील यांनी जि.प. अध्यक्षा रंजना पाटील यांना सांगितले. यात आता राज्याची नियोजनासंदर्भात बैठक होणार असल्याने जिल्ह्यासाठी मिळालेला निधी खर्च होणे आवश्यक असल्याने सर्वच यंत्रणांनी सोमवारपर्यंत विविध कामांचे कार्यादेश द्यावे, अन्यथा राज्याच्या बैठकीत उघडे पडू, अशी हतबलताही पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
मुक्ताईनगर तालुक्यात आरोग्य उप केंद्र
मु्क्ताईनगर तालुक्यातील काही भागात फासेपारधी समाजाची वस्ती आहे. त्यांना आरोग्यविषयक उपचारासाठी मुक्ताईनगरपर्यंत यावे लागते. हे त्यांच्यासाठी अवघड ठरत असल्याने आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. यासाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
तालुका क्रीडा संकुलांचे कामे मार्गी लावा
राज्य शासनाच्या निधीतून जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुले मंजूर असून याचे काम अपूर्ण आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून यासाठी निधी मिळावा, जेणेकरुन ही संकुले पूर्ण करता येईल अशी मागणी उपस्थित आमदार किशोर पाटील यांनी केली. तसेच आमदार अनिल पाटील यांनीही क्रीडा संकुलाची कामे रखडल्याने नाराजी व्यक्त केली. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना भेटून विंनती करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.