लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लावण्यात आले असले तरी काही व्यावसायिक नियम मोडून व्यवसाय करीत आहेत. मनपा प्रशासनाकडून शुक्रवारी फुले मार्केटची सर्व प्रवेशद्वारे पत्रे लावून बंद करण्यात आली आहेत. सर्व प्रवेशद्वारे बंद केल्याने मालाची वाहतूक करणे आणि मार्केटमध्ये गर्दी करणाऱ्यांना आळा बसणार आहे. यासह दुपारून १२ वाजेनंतरदेखील दुकानाचे शटर बंद करून व्यवसाय करणाऱ्या १० दुकानदारांवरदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महिनाभरापासून जिल्हा प्रशासनाकडून शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. यासह सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यानच अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असतानादेखील अनेक व्यावसायिक दुपारी १२ वाजेनंतरदेखील दुकाने सुरू ठेवत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे, तसेच शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये अनेक दुकानदार लपूनछपून व्यवसाय करत असल्याचे पाहावयास मिळाले. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून याठिकाणी वेळोवेळी कारवाई करूनदेखील दुकानदारांना शिस्त लागत नसल्याने मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या आदेशानंतर शुक्रवारी फुले मार्केटची सर्व प्रवेशद्वारे पत्र्याद्वारे सील करण्यात आली आहेत. केवळ दाणाबाजार भागाकडून मार्केटमध्ये येण्यासाठी एकमेव प्रवेशद्वार उघडे ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली आहे. महात्मा फुले मार्केटमध्ये दुपारून अनेक अनधिकृत हॉकर्स व्यवसाय थाटत होते, तसेच दुकाने बंद असतानादेखील या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपायुक्त यांनी दिली.
शहरातील दहा दुकाने सील
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरात लपूनछपून व्यवसाय करणाऱ्या दहा दुकानदारांवर कारवाई केली आहे. सर्व दुकाने सील करण्यात आली असून, प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. बळीराम पेठ भागातील व सेंट्रल फुले मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानामध्ये शटर लावून कपड्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले होते, तसेच याठिकाणीदेखील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुकान बंद करून मध्ये १५ हून अधिक ग्राहक आढळून आले, तसेच अनेक ग्राहकांनी मास्कदेखील लावला नव्हता. यामुळे महापालिका प्रशासनाच्या पथकाने सर्व दुकाने सील केली आहेत.
या दुकानांवर झाली कारवाई
शहरातील दहा दुकाने शुक्रवारी सील करण्यात आली आहेत. यामध्ये के.एच. ट्रेडर्स, राहुल गारमेंट, जय मातादी रेडीमेड, एसएस कलेक्शन, एसएम टेलर्स, राज प्रकाश, त्रिमूर्ती ऑफसेट, जैन हार्डवेअर हाऊस, चांदनी एजन्सी, नंदिनी एजन्सी ही दुकाने महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आली आहेत. गेल्या आठवडाभरात महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरातील ४९ दुकाने सील केली असून, ८० हून अधिक हॉकर्सवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.