आपल्या संपूर्ण जीवनात, नवनिर्मितीच्या असंख्य वस्तू आपल्यासाठी देणारा हा, आपल्या अखेरच्या यात्रेच्या वेळीदेखील सोबत घटरूपाने येतो.उन्हाळ्याचे दिवस, अंगाची लाही-लाही होतेय, पाणी किती पण प्या, समाधान नाही. पोट टम्म झालेय! आपोआपच आठवण येते, मातीशी नाते सांगणाऱ्या, नव्हे तर मातीपासून बनलेल्या ‘माठाची’! शेतीला जीवन समर्पण करणाºया बैलांचा सण ‘पोळा’ आला, पूजेसाठी मातीचे ‘बैल’ हवे. गौरी-गणपती-भुलाबाईचे दिवस, गौरी-गणपतीचे शाडूच्या मातीचे मुखवटे-मूर्ती हव्यात! नवरात्र आहे, दुर्गादेवीची मूर्ती हवी! दिवाळीचा आनंदोत्सव! आठवण येते, देवापुढे दीप लावून कृतज्ञतेने साजरा करण्याची! दीपावलीचा आनंद दीपोत्सवाच्या मार्गाने घरभर, आवारात दिवे लावून साजरा करतो. त्या मातीपासून बनविलेल्या पणतीमुळे! घर बांधायचे आहे - विटांशिवाय कसे बांधणार? आपल्या आयुष्याशी, आयुष्यभर नाते सांगत बांधला गेलेला, मातीशी नाते सांगणारा हा 'ब्रह्मदेवाचा पुत्र'! --- हो, ऋग्वेद काळापासून आलेला, स्वत:ला प्रजापतीचे वंशज समजणारा, 'कुंभकार'! आपल्या भाषेत 'कुंभार' ! ओल्या मातीपासून सारे निर्मिणारा - कुंभार !ब्रह्मदेवाने आपल्या मुलांत त्याच्याजवळ असलेला ऊस तुकडे करून वाटून टाकला. सर्वांना ऊस मिळाल्यावर मुलांनी खाल्ला. ब्रह्मदेवाचा हा मुलगा आपल्या मातीकामात नवनिर्मितीच्या कामात इतका गढून गेला होता, की त्याने मिळालेला ऊस तिथेच रोवून ठेवला. काम आटोपल्यावर पहातो तर काय? त्याला धुमारे फुटून संपूर्ण ऊस उगवला होता. ब्रह्मदेवाने काही दिवसांनंतर मुलांना ऊस मागीतला. कोण देणार खाल्लेला ऊस? याने दिला संपूर्ण ऊस, नवीन निर्मिलेला! ब्रह्मदेवाने त्याच्या कामातील निष्ठेवर प्रसन्न होऊन- त्याला 'प्रजापती' संबोधले !कुंभाराला लागणारा कच्चा माल, म्हणजे गाळाची माती- तलावातील, नदीतून वाहून येणारा, नदीकिनारी साठणारा गाळ ! हा उन्हात वाळवतात, कुटून बारीक करतात, त्यात घोड्याची लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे वगैरे कालवून काला करतात. चांगला काही दिवस मुरू देतात. तो चिखल चांगला तुडवून एकजीव करतात. त्याचे गोळे बनवतात, वस्तू त्या मातीने चाकावर करतात. चाक साधारणत: एकदीड फूट व्यासाचे, दहा-बारा आºयाचे, लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते. कुंभार जेव्हा आपले काम करतो, त्यात अगदी रमून जातो. एका हाताने जवळच्या छोट्या बांबूच्या तुकड्याने, चाकाला वारंवार गती देत, चाकावरच्या मातीच्या गोळ्याला आपल्या दुसºया हाताने, जेव्हा आतून-बाहेरून आधार देत, कमी-जास्त दाब देत, आकार देत, नवनिर्मिती करतो.पहाता-पाहता आपल्यासमोर नवनिर्मिती आकार घेत असते. आपणसुद्धा निर्मितीतले विविध टप्पे पहाण्यात रमून जातो. निर्मितीचा आनंद, आपल्यासमोर निर्मिती होते आहे हे समाधान, अनुभवण्याचे आहे, सांगण्याचे नाही.महादेवाने कुंभार निर्माण केला, तेव्हा त्याने कुंभारणीची निर्मिती करण्यास दुर्गाला सांगितले. कुंभारणीची निर्मिती झाली खरी, पण ती अगदी दुर्गेसारखी दिसत होती. कुंभाराला आपली बायको ओळखू येईना.महादेवाने कुंभाराला सांगितले, ‘जिच्या नाकात, डोक्यात अलंकार नाही, ती तुझी बायको समज’. तेव्हापासून आजतागायत कुंभाराच्या बायका नाकात आणि डोक्यात दागिना घालत नाहीत.१४ एप्रिल, १६९९ ची घटना! गुरू गोविंदसिंग यांनी धर्माप्रती असलेल्या धैर्यबुद्धीची परीक्षा करण्यासाठी चैत्रातील विराट संमेलनात जाहीर केले- 'दुर्गादेवी, आपणाकडून बलिदान मागत आहे. कोण तयार आहे? सभा सुन्न झाली. हजारोंमधून, बलिदानासाठी कोण तयार होणार? 'देवीची इच्छा पूर्ण होणार नाही?' गुरु गोविंदसिंघ ! एक उठला- जगन्नाथचा हिंमतराय कुंभार! अजून चार उठले! खालसा पंथामधील, 'पंचप्यारे' मधील 'हिंमतराय कुंभार' हाच 'भाई हिंमतसिंग'!'फिरत्या चाकावर मातीला आकार देणाºया', पांडुरंगाचे भक्त 'गोरोबा काकांना' कोण विसरेल? हो, 'गोरा कुंभार' हे उस्मानाबाद जवळच्या 'सत्यपुरी' गावात, सन १२६७ मध्ये जगात आलेले, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेले, संतांमधील ज्येष्ठ नाव! पांडुरंगाच्या पायी झालेली अवस्था वर्णन करताना ते म्हणतात, देवा तुझा मी कुंभार। नासीं पापाचें डोंगर॥-अॅड.माधव भोकरीकर
ओल्या मातीपासून सारे निर्मिणारा - कुंभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 2:48 PM