जळगाव : सोमवारी येणारी बकरी ईद व गुरुवारचा स्वातंत्र्य दिन या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री तांबापुरा, मेहरुण, सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, राम नगर, एमआयडीसी, अजिंठा चौक व इतर संवेदनशील परिसरात आॅल आऊट आॅपरेशन ही मोहिम राबविली. त्यात रेकॉर्डवर असलेल्या विविध २१४ पैकी ८६ आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली तर ६० जणांवर प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली. त्याशिवाय हॉटेल, ढाबे व लॉजचीही तपासणी करण्यात आली.बकरी ईद, स्वातंत्र्य दिन व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत पाचही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी शनिवारी सायंकाळी शनी पेठच्या हद्दीत मॉकड्रील व एमआयडीसीच्या हद्दीत पथसंचलन झाले. त्यानंतर रात्री पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी संवेदनशील भागात आॅल आऊट आॅपरेशन राबविले. शहरात चार ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले होते. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत तपासणी झाली.जिल्ह्यात १०९ हिस्ट्रीशिटरची तपासणीआॅल आऊट आॅपरेशनमध्ये जिल्हाभरात १०९ हिस्ट्रीशीटरची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत १७३ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. एकट्या जळगाव शहरात ५५ हिस्ट्रीशीटर तपासण्यात आले तर त्यातील ९ जणांना अटक झाली आहे. त्याशिवाय २०७ वाहनांची तपासणी करण्यात आली. एमआयडीसीचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, शहरचे अरुण निकम, शनी पेठचे विठ्ठल ससे, तालुक्याचे दिलीप भागवत, रामानंद नगरचे अनिल बडगुजर, जिल्हा पेठचे संदीप आराक यांच्यासह उपनिरीक्षक संदीप पाटील, रमेश वावरे, विशाल सोनवणे, राजकुमार ससाणे,विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, मनोज सुरवाडे, संजय धनगर, निलेश पाटील, सचिन पाटील, यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.सात तास तपासणीरात्री ११ ते पहाटे ६ या वेळेत सात तास ही मोहीम चालली. त्यात फरारी, पाहिजे असलेले आरोपी, हिस्ट्रीशीटर, टॉपटेप गुन्हेगार, माहित असलेले गुन्हेगार, बंदी फरारी व नॉन बेलेबल आरोपींची तपासणी करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर अशा आरोपींची संख्या २१४ आहे. त्यापैकी रात्री ८६ आरोपींची तपासणी करण्यात आली. नॉनबेलेबल ९, टॉपटेन १५, हिस्ट्रीशीटर १९ व इतर अशा ६० जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली.
रस्त्यावर वाहनांची तपासणीमुख्य रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात विना सीटबेल्ट व विना परवाना वाहन चालविणाऱ्या प्रत्येकी दोन अशा चौघांवर कारवाई करण्यात आली. घरफोडी, दरोड्याच्या घटनांमध्ये वाहनांचा होत असलेल्या वापरामुळे वाहनांचीही तपासणी करण्यात आली. रात्रभर मुख्य रस्त्यावर तसेच चौकाचौकात पोलीस दिसत होते. महामार्गालगत असलेले ४ हॉटेल्स, २ ढाबे व ३ लॉजचीही संशयावरुन तपासणी करण्यात आली, मात्र त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही.