लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यातील एका गावात कोरोनाचा नवा ‘ डेल्टा प्लस’ हा संसर्ग आढळून आला आहे. या गावात ४५ जणांच्या कोरोना पॉझिटिव्ह चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात सात जण पॉझिटिव्ह आले होते. डेल्टप्लसची त्यांना बाधा होती. त्यापैकी ४ जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले होते, तर तीन जणांना पाळधी येथील कोरोना सेंटरला उपचारासाठी दाखल केले होते. यात सातही जणांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
३ मे रोजी तालुक्यातील एका खेडेगावात कोरोना तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात ६५ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी सातजण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. या पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने आयसीएम, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याठिकाणी तपासणी अहवालात या रुग्णांमध्ये नवा संसर्ग ‘डेल्टा प्लस’ या नव्या संसर्ग असल्याची बाब तीन आठवड्यापूर्वी लक्षात आली होती.
आरोग्य विभागाने ही बाब त्यावेळी जाहीर केली नव्हती. पण तालुका आरोग्य विभागाला या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्याच्या सूचना मिळाली होती. त्यानुसार १६८ जणांची तातडीने चाचणी करण्यात आली. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४५ जणांची तपासणी केल्यावर सुदैवाने त्यापैकी कुणीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांनादेखील सौम्य लक्षणे असल्याने ते होमक्वारंटाइन होते. सर्वांनी आता कोरोनावर मात केली आहे. या गावात रुग्ण आढळून आल्याने १०० जणांचे लसीकरण केले. गावात त्यावेळी कन्टेन्मेंट झोन करण्यात आले होते. आता गावात परिस्थिती सामान्य आहे.आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना राबवल्या. परिणामी ७ रुग्णांसोबतच त्यांच्या संपर्कात आलेले सर्वजण सध्या धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील यांनी दिली.