लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यभरात डेल्टा प्लसने संक्रमित २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सात जण हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या सातही जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नव्हती. तसेच त्यांना कोणत्याही विशेष उपचारांची गरज भासली नाही. हे सर्व रुग्ण एकाच ग्रामीण क्षेत्रातील आहेत, या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अजून सविस्तर अभ्यास सुरू असल्याने त्याच्या घातकतेवर आताच काही सांगता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की,‘डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे राज्यात रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सात जळगाव जिल्ह्यातील आहेत. या सविस्तर तपासणीसाठी १०० नमुने जिल्ह्यातून मे महिन्यात पाठवण्यात आले होते. त्यातील हे सात जण आहेत. तसेच ज्या भागातून हे रुग्ण आढळून आले आहेत. त्याच भागातील पॉझिटिव्हिटी दरदेखील १.२१ एवढाच सामान्य आहे. या सर्वांच्या जवळच्या हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टदेखील तपासण्यात आले आहेत. हा एक वेगळा व्हेरिएंट असला तरी हे सातही जण ठणठणीत आहेत. तसेच त्यांना कोणत्याही विशेष औषधोपचाराची गरज भासलेली नाही. असे असले तरी आता या भागातील चाचण्यांची संख्या आणखी वाढवणार आहे. तसेच सविस्तर तपासणी आणि अभ्यासासाठी आणखी जास्त नमुने पाठवणार आहोत.’
‘त्या’ सातही जणांनी लस घेतलेली नव्हती
राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील जे सात जण कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने संक्रमित झाले आहेत. त्या सातही जणांनी ही कोरोनाची लस घेतलेली नव्हती, अशी माहितीदेखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी दिली.
या भागातील परिस्थितीही सामान्यच
डेल्टा प्लस व्हेरिएंटने जे सात जण संक्रमित झाल्याचे आढळून आले आहेत. ते सातही जण एकाच क्लस्टरमधील आहे. मात्र या भागात कोरोनाची परिस्थिती जिल्ह्याच्या इतर भागांप्रमाणे सामान्यच आहे. या भागाचा पॉझिटिव्हिटी रेट हा १.२१ टक्के एवढाच आहे. तसेच येथे रुग्णसंख्यादेखील जिल्ह्यातील इतर भागांप्रमाणेच आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
नियम पाळण्याचे आवाहन
कोरोनाचा कोणताही व्हेरिएंट असला तरी हा आजाराच घातक आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या बचावासाठी मास्क वापरणे, पुरेसे अंतर राखणे, सॅनिटाईज करणे हे तीन नियम पाळणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.