जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद व नंतर सम-विषम पद्धतीने सुरू झालेल्या बाजारपेठेतील सर्व दुकाने आता पाच महिने १० दिवसांनंतर सोमवार, ३१ आॅगस्टपासून पूर्णपणे सुरू होणार आहे. यामुळे आता व्यापाराला अधिक गती येऊन बाजारपेठेत अधिक चैतन्य येईल, असा विश्वास व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने २२ मार्च रोजी असलेला ‘जनता कर्फ्यू’ व त्यानंतर २३ मार्चपासून करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. त्यानंतर १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरातील व्यापारी संकुल वगळता रस्त्यांवरील दुकाने सम-विषम पद्धतीने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र व्यापारी संकुले बंद असल्याने ती सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. यात २० जुलैपासून ही संकुले सुरू करण्याची मुभा देण्यात आली खरी मात्र त्यात २० पेक्षा कमी दुकाने असलेले संकूल सम-विषम पद्धतीने उघडावी व इतर मोठ्या संकुलांना केवळ आॅनलाईन व्यवसायाची परवानगी देण्यात आली. यात ही संकुले सुरू झाले तरी आॅनलाईन व्यवहाराच्या पुरेसा सुविधा नसल्याने व्यापारी वर्ग चिंतेतच होते.त्यानंतर मात्र ५ आॅगस्टपासून व्यापारी संकुलांमध्ये प्रत्यक्ष व्यवसायाचीही परवानगी देण्यात आली.मात्र त्यातही आठवड्यातील चारच दिवस दुकाने सुरू ठेवता येतील अशी अट टाकण्यात आली. मात्र, तरीही रविवार व शनिवार वगळता सर्व दुकाने दररोज उघडण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत होती.अखेर मनपाने व्यापाऱ्यांच्या मागणीवर शिक्कामोर्तब करीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सोमवार ते शुक्रवार पूर्णवेळ दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता शनिवार व रविवार वगळता इतर दिवस दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडता येणार आहे. शनिवार व रविवार केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू राहणार आहेत.
सव्वा पाच महिन्यानंतर सर्व दुकाने उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:15 AM