लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पिंप्राळा आणि निमखेडी शिवारातील मिळकतींवर वारस दाखल करण्याच्या कामात रीतसर अर्ज प्रकरण तलाठी कार्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानुसार फेरफार दाखल करून पत्नी, मुलगा व आई यांना वारस दाखल झाले होते. तरी कुटुंबातील आपापसातील वादात तलाठी यांच्यावर झालेले आरोप हे तथ्यहीन आहे, असे निवेदन जळगाव तालुका तलाठी संघाने प्रांताधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदार नामदेव पाटील यांना दिले आहे.
पिंप्राळा येथे काही दिवस आधी दिराने भावजयीची हत्या केली होती. मयत महिलेचे नाव योगिता मुकेश सोनार असे आहे. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाली होती. त्यात मयत महिलेच्या नातेवाइकांनी सत्यता न पडताळता प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तलाठी यांची प्रतिमा मलीन झाली असून त्यातील सत्यता निर्दशनास आणून देण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे. तसेच जळगाव तालुका तलाठी संघाने या तथ्यहीन आरोपांचा जाहीर निषेध केला आहे. या प्रकरणात सदर वारस हे हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ नुसार लावण्यात आले आहे. त्यातील कलम ८ नुसार मयत व्यक्तीची पत्नी, मुलगा व आई असे वारस दाखल झाले आहेत.