सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: आतापर्यंत ज्यांनी इंडियाचा गवगवा केला, आता त्यांनाच इंडियाची ॲलर्जी होऊ लागली. खाज सुटायला लागली अशी टिका माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख (ठाकरे गट) उध्दव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर केली. महापालिकेच्या आवारात साकारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. जयश्री महाजन, सुनील महाजन व कुलभूषण पाटील यांच्याहस्ते सव्वा किलो चांदीची तलवार ठाकरे यांना भेट देऊन सत्कार करण्यात आला. ११.३७ वाजता ठाकरे यांचे महापालिका आवारात आगमन झाले. प्रारंभी पुतळ्याचे अनावरण त्यांच्याहस्ते करण्यात आले.
कामाची उंची कधी गाठणार?
महापालिका आवारात उभारण्यात आलेला पुतळा किती फुटाचा व जगातील सर्वात उंच पुतळा कुठे आहे हे सांगायची गरज नाही. पुतळ्याची उंची ठिक आहे, पण कामाची उंची कधी गाठणार असा सवाल त्यांनी मोंदीना त्यांचे नाव न घेता केला. सरदार पटेल दूरदृष्टीचे होते. त्यांनी त्या काळात आरएसएसवर बंदी आणली होती. त्या व्यक्तीला स्वातंत्र्य प्रेम म्हणजे काय, देशप्रेम काय हे पक्क कळत होतं. १७ सप्टेबर रोजीच त्यांनी मराठवाडा स्वतंत्र केला. याच दिवशी जिनांचं निधन झालं होतं. तरी देखील पटेलांनी त्या दिवशी कारवाई केली. जशी मराठवाड्यात कारवाई झाली तशी मणिपुरात कारवाई करण्याची हिमंत यांची होत नाही.हे कसले आले पोलादी पुरुष, हे तर तकलादू पुरुष आहेत, अशी टिका ठाकरे यांनी केली.
निष्ठेच्या परीक्षेत शिवसैनिक पास!
पटेल यांचा पुतळा अनावारणावरुन जो काही प्रकार घडला, त्याला जळगावातील शिवसैनिक पोलादी मनाचे, पोलादी ताकदीचे आहेत. ते निष्ठेचे परिक्षेत पास झालेत अशा शब्दात ठाकरे यांनी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व स्थानिक शिवसैनिकांचे कौतूक केले.