जळगाव : शहरातील महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्सना फुले मार्केटच्या आतील बाजूस फूटपाथवर नियम व अटी लावून किरकोळ व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ३५० हॉकर्स बांधवांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते नितीन लढ्ढा, नगरसेवक प्रशांत नाईक यांना देण्यात येऊन न्याय मिळवून देण्याबाबत साकडे घालण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शहरातील मुख्य बाजारपेठा व मुख्य रस्त्यालगत व्यवसाय करण्यास हॉकर्सला बंदी घालण्यात आली होती. आता दुसरी लाट ओसरली असली तरीदेखील हॉकर्सला व्यवसाय करण्यास प्रशासनाकडून मज्जाव केला जात आहे. हॉकर्सला व्यवसाय करू न दिल्यास हॉकर्सच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येईल असे हॉकर्सकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियचे अध्यक्ष नंदू पाटील, सचिव सचिन जोशी यांच्यासह सय्यद सादिक, मनीष चौधरी, शोएब शेख, मोहम्मद शेख, भरत पवार, ज्ञानबा गुजर, ईश्वर सोनवणे, विक्की सोनवणे, मनोज राणा, शेखर वाणी, प्रेम कटारिया, शुभम सोनार, शरद कोळी, मनोज चौधरी, निहाल अन्सारी, जहांगीर शेख, भय्या चौधरी, इरफान शेख, आदी उपस्थित होते.
आत्महत्याशिवाय पर्याय नाही
निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेचे हॉकर्स नोंदणीकृत असून, आजपर्यंत महानगरपालिकेने दिलेल्या रहदारी नियमांचेसुद्धा पालन करीत आहोत. मात्र, व्यवसाय संपूर्ण बंद असून, अजून काही दिवस असेच सर्व व्यवसाय बंद राहिल्यास आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. अशा परिस्थितीत सरकारने अनलॉक सुरू केलेले असल्याने व व्यापारी संकुले व इतर सर्व सेवा सुरू झाल्या असल्याने शहरातील सर्व हॉकर्सवरच कारवाई का? हॉकर्स बांधवांवर जुलमी कारवाई केली जाते की, त्यांचा संपूर्ण माल जमा केला जातो व परत मिळत नाही. तसेच गुन्हे दाखल करण्याची प्रशासनातर्फे वारंवार ताकीद दिली जाते. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे आणि त्यांची टीम एखाद्या चोराप्रमाणे वागणूक देत असल्याचा आरोप हॉकर्स संघटनेकडून करण्यात आला आहे.