जळगाव : शहरातील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना व टपरी चालकांना सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जळगाव शहर हॉकर्स व टपरीधारक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल व टपरी पूर्णपणे बंद होते. यामुळे उपासमारीची वेळ आली होती. जनता कर्फ्यू जाहीर झाला. तो सुध्दा हॉकर्सने पाळला. आता हॉकर्स आर्थिक अडचणीत सापडले आहे. कर्जाचे डोंगर झाले आहेत. पाल्यांची फी भरली गेलेली नाही. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणून परमिटरूम व हॉटेल्सप्रमाणे खाद्य पदार्थ विक्रेता व टपरीधारकांना सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर दिनेश हिंगणे, सुनील सोनार, सुनील जाधव, मोहन तिवारी, राजेंद्र चौधरी यांच्या स्वाक्ष-या आहेत.