जळगाव : गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधून सावरत नाही तोच पुन्हा आता मिनी लॉकडाऊनमध्ये सलून व्यवसाय बंद केल्याने व्यवसायिक हवालदिल झाले आहे. त्यामुळे सलून व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामध्ये इतर व्यवसाय सुरू आहे, मात्र सलून व्यवसाय बंद करण्यात आला आहे. हा नाभिक समाजावर मोठा अन्याय असून गेल्या वर्षाच्या लॉकडाऊनने सलून व्यवसायिकांची कंबरडे मोडले आहे. हे लॉकडाऊन उठल्यानंतर व्यवसायिकांनी घरातील दागिने विकून दुकान भाडे, घर भाडे, वीज बिलाचा भरणा केला. कर्जाचे हप्ते फेडताना समाजबांधव मेटाकुटीस आले. आता पुन्हा या लॉकडाऊन मध्ये हा व्यवसाय बंद केल्याने जगायचे कसे असा प्रश्न समाजबांधवांना समोर पडला आहे. यात चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील गणेश सैंदाणे यांनी लॉकडाउनच्या कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखाची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.
सर्व परिस्थिती पाहता सलून दुकाने पूर्ववत सुरू करण्याची परवानगी द्यावी, सर्व वयोगटातील सलून कारागीर व व्यवसायिकास लस देण्यात यावी, कोरोना काळातील आत्महत्याग्रस्त व्यावसायिकाच्या कुटुंबास त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगार, नारायण सोनवणे, आत्माराम महाले, लीना निकम, अनिता पाटील, रिषिता राव, ज्योती बरबन, अर्चना जाधव, संगीता चौधरी, जयंत महाले, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.