लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार संपूर्ण लाॅकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. त्याला व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे; मात्र संपूर्ण लॉकडाऊन होईपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कॅट संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या आमदारांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बहुतांश दुकाने मागील सहा दिवसांपासून बंद आहेत. त्यात आता राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊनचे नियोजन करीत आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी मार्चअखेरची सर्व कामे, तसेच मागील महिन्याचे मासिक जीएसटी व इतर कर भरणा अशी सर्व कामे थांबलेली असल्याने मोठ्या प्रमाणात दंड लागण्याची शक्यता आहे. तसेच गुढीपाडवा व रमजान हे मोठे सण आले असून, यासाठी मोठ्या प्रमाणात मालाचा साठा व्यापाऱ्यांनी केलेला आहे.
संपूर्ण लॉकडाऊनला सर्व व्यापारी असोसिएशनने पाठिंबा देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे हे संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होईपर्यंत जळगाव शहर व जिल्ह्यासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व नियमांचे पालन करून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी व गंभीर परिस्थितीत सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी आमदार सुरेश भोळे, राज्य कॅट असोसिएशनतर्फे राज्य वरिष्ठ उपाध्याय पुरषोत्तम टावरी, राज्य उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शाह यांनी केली. याप्रसंगी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह आमदार संजय सावकारे, चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ उपस्थित होते.