लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यासह शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या नियमावलीनुसार ६ एप्रिलपासून शहरातील मार्केटमधील दुकाने बंद आहेत. गेल्या वर्षीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील मार्केटमधील सर्व दुकाने १३५ दिवस बंद होती. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली असून, महिनाभरापासून दुकाने बंद असल्याने मार्केटमधील दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गाळेधारकांना पोटापाण्याचा विचार करून दिवसातून किमान ३ ते ४ तास का असेना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महात्मा फुले मार्केट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
सोमवारी महात्मा फुले मार्केट व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी हिरानंद मंधवानी, प्रेमचंद जैन, राजेश वर्यानी, बबलू समदडिया, अशोक कौराणी यांच्यासह काही गाळेधारक उपस्थित होते.
गाळेधारकांनी प्रशासनाला सुचवले चार पर्याय
१. फुले मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात व्यवसाय सुरू करण्यासाठी चार पर्याय सुचवले आहेत. यामध्ये पहिला पर्याय एक दिवस अत्यावश्यक सेवांचे व्यवसाय सुरू ठेवावे तर दुसऱ्या दिवशी इतर व्यवसायात सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.
२. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना प्रशासनाने सकाळी ७ ते ११ ही वेळ निश्चित करून दिली आहे. तर प्रशासनाने आता इतर व्यावसायिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.
३. गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने पी १, पी २ या पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. याच पद्धतीनुसार यावर्षीदेखील जिल्हा प्रशासनाने व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.
४. जिल्हा प्रशासनाने सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी अत्यावश्यक सेवांच्या व्यवसाय करणाऱ्यांना परवानगी देण्यात यावी. तर गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवशी इतर व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी फुले मार्केट असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. यात चार पर्यायांवर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी ही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तर आमच्यावर येईल उपासमारीची वेळ
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात सर्व व्यापारी बांधवांना नियमित भाडे भरावे लागते, त्यात दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील नियमित वेतन द्यावे लागत आहे; मात्र पुन्हा अनेक दिवस दुकाने बंद ठेवावी लागली तर सर्व व्यापारी बांधवांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने व्यापारी बांधवांच्या कुटुंबीयांच्या व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गाचा विचार करून काही वेळ दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीदेखील व्यापारी बांधवांनी केली आहे.