लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १००, १० व पाच रुपयांच्या सर्व जुन्या नोटा या बंद होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर असल्याने या नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी वाढत आहे. मात्र प्रत्यक्षात या नोटा बंद होणार असण्यासंदर्भात बँकांना कोणतेच निर्देश नसल्याने यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बँकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे बाजारपेठेतही या नोटा स्वीकारल्या जात असून बंदबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
१००, १० व पाच रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचे संदेश, व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र याविषयी अद्यापपर्यंत बँकांना कोणत्याही सूचना नसल्याचे अग्रणी बँकेच्यावतीने सांगण्यात आले. केवळ सोशल मीडियावरील माहितीवरून सध्या बँकांमध्ये या नोटा जमा करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सध्या बाजारपेठेतही याचा परिणाम दिसत नाही. व्यापाऱ्यांकडूनही या नोटा स्वीकारल्या जात असून ग्राहकही त्या घेत आहेत.
व्यवहार कसे करणार?
किरकोळ व्यापार हा कमी दराच्या नोटांवरच चालतो. यात पाच, १० रुपयांच्या नोटा महत्त्वाच्या असून त्यांच्याशिवाय व्यवहार ठप्प होऊ शकतात. उलट सध्या कमी दराच्या पाच, १०, २० व ५० रुपयांच्या नोटांची बाजारपेठेत चणचण असल्याने व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी व्यापारी बांधव या नोटा बँकांमध्ये जमा करीत नाहीत. या नोटा बंद झाल्यास साधारण माणसाची कुचंबणा होऊ शकते. त्यामुळे व्यापार सुरळीत चालण्यासाठी या नोटा स्वीकारणे गरजेचेच आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बँकांमध्ये वाढले प्रमाण
नोटाबंदीच्या वेळी ५०० आणि एक हजाराच्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नसल्याचे सांगितले जात आहे. उलट जी नोट बंद करायची आहे, सर्वप्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील असे आरबीआयचे धोरण आहे. असे असले तरी सोशल मीडियावरील संदेशामुळे अनेक जण बँकांमध्ये या १००, १० व पाच रुपयांच्या नोटा जमा केल्या जात असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तसे न करता याविषयी आपापल्या बँक अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती घेऊनच निर्णय घ्यावा, असेही आवाहन केले जात आहे.
बँकांना कोणत्याही सूचना नाहीत
१००, १० व पाच रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत अथवा त्या स्वीकाराव्या की नाहीत याविषयी बँकांना कोणत्याही सूचना नसल्याचे सांगण्यात आले. तसेच ग्राहकांकडून या नोटा स्वीकारल्या जात नसतील तर त्यांनाही काय सांगावे अथवा त्यांना या नोटा देऊ नये, या विषयीदेखील कोणत्याही सूचना नसल्याने पूर्वीप्रमाणेच सुरळीत व्यवहार सुरू असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.
————————-
१००, १० व पाच रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत की नाहीत तसेच त्या स्वीकारणे अथवा न स्वीकारणे याविषयी बँकांना कोणत्याही सूचना नाहीत. मात्र सोशल मीडियावरील संदेशामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सत्यता काय आहे, याविषयी बँक अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी.
- अरुण प्रकाश, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
१००, १० व पाच रुपयांच्या या नोटा आम्ही अजूनही स्वीकारत आहोत. नोटा बंदबाबत काही सूचना नाहीत. या नोटा बंद झाल्यास त्याचा सामान्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
- सुरेश बरडिया, व्यापारी
१००, १० व पाच रुपयांच्या नोटा बंद झाल्याविषयी सरकारकडून काहीही घोषणा अथवा माहिती नाही. त्यामुळे किरकोळ व्यापारासाठी या नोटा महत्त्वाच्या असल्याने त्या आम्ही स्वीकारण्यासह ग्राहकही घेत आहेत.
- रिकेश गांधी, व्यापारी