ॲट्रॉसिटीचा गुन्हा : प्रकरण ठाणे पोलिसांत वर्ग
जळगाव/अकोला : मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ३३ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांचाही समावेश आहे. दरम्यान, हा दाखल गुन्हा ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह ३३ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराज घाडगे यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भीमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. २०१६ मध्ये कल्याण येथे ही घटना घडली होती. त्यावेळी बापू रोहोम हे तेथे निरीक्षक पदावर कार्यरत होते. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह ३३ अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोट...
घाडगे यांनी कल्याणमध्ये गोळीबार केला होता. त्या गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले होते. त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पथकात मी पण होतो. जातिवाचक शिवीगाळ केलीच नाही. घाडगे यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
-बापू रोहोम, पोलीस निरीक्षक