स्टार १०००
विजयकुमार सैतवाल
जळगाव : खाद्यतेलाच्या कच्च्या मालाचे भाव वधारण्यासह अमेरिकन डॉलरचेही दर वधारत असल्याने त्याचा खाद्यतेलाच्या भावावर परिणाम होत आहे. आता खाद्यतेलाच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यामध्ये देवापुढील दिवा लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचेही भाव वधारले आहेत. परिणामी पोटपूजेसह देवपूजाही महागली, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
दररोज प्रत्येक घर तसेच खाद्यपदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाक घराच्या ‘बजेट’वर होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाच्या भावात वाढ होऊन महागाईचा चांगलाच तडका बसत आहे. हे भाव वेगवेगळ्या कारणांनी वाढले असून यात आता पूजेसाठी लागणारे तेलही वधारले आहे.
कारण काय?
-सर्वाधिक वापर असलेल्या सोयाबीन तेलाचा कच्चा माल अर्थात सोयाबीनचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटलवरून ते थेट नऊ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत.
- पामतेल विदेशातून आयात होते. त्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होत असतो. आता अमेरिकन डॉलरचे दर ७४ रुपयांच्या पुढे गेले असून त्यामुळेही तेलाचे भाव वाढत आहेत.
- इंधनाचे दर वाढल्याने मालवाहतुकीचेही भाडे वाढले असून शिवाय हमाली दरदेखील वाढली आहे.
देवापुढचा दिवाही महागला
गेल्या अनेक दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात मध्यंतरी काहीशी घसरण झाली होती. त्यामुळे दिलासा होता. आता तर खाद्यतेलासह देवापुढे लावण्यात येणाऱ्या दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाचेही भाव वधारल्याने महागाईच्या झळा वाढत आहेत.
- संगीता सोळंके, गृहिणी
दिवसेंदिवस महागाई वाढतच असून यामुळे घर कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खाद्यतेलासोबत पूजेचेही तेल वधारल्याने चिंता वाढली आहे.
- चित्रा घोडके, गृहिणी.
तेलाचे दर (प्रति किलो)
तेल-जुलै २०२०-जुलै २०२१
सोयाबीन-१२०-१५५
सूर्यफूल-१४०-१६५
पाम-१२०-१३८
शेंगदाणा-१४५-१७०
पूजेसाठीचे तेल-११०-१४०