वाकोद, ता. जामनेर, जि.जळगाव : ‘आपले सरकार पोर्टल’वरील ‘तक्रार तुमची जबाबदारी आमची’ यावर वाकोद येथील एका विद्यार्थ्याने केलेल्या अवैध धंदेविरोधात एका आॅनलाइन गोपनीय तक्रारीने अख्खे पोलीस प्रशासन हादरल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे वाकोद परिसरातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावर लगाम लावण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र विशेष बाब म्हणजे पोलिसांनी धाडी टाकण्याच्या आधीच गावातील अवैध धंदे बंद झाल्याचे आढळून आले.शासनातर्फे गावोगावी नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी याबाबत तक्रार निवारणासाठी ‘आपले सरकार पोर्टल’ आॅनलाइन कार्यान्वित करण्यात आले आहे.या पोर्टलवर काही दिवसांपूर्वी वाकोद येथील एका विद्यार्थ्याने गावी मोठ्या प्रमाणावर बोकाळलेले अवैध धंदे व यामुळे गावात होणारे दुष्परिणाम पाहता यावर तक्रार दिली.या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी वाकोद गावी अवैधरित्या सुरू असलेल्या धंद्यांबाबत पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली होती. हे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होेते. यावरून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पहूर पोलिसांकडून वाकोद गावाच्या अवैध धंदेचालकांवर कारवाईची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून गावी सुरू आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या अवैध धंदे करणाºयांवर अद्याप एकही करवाई झाली नाही, हे विशेष आहे.पोलीस धाडी टाकण्याआधीच वाकोद गावी अवैध धंदे सोयीस्कररित्या बंद झालेले होते. यामुळे पोलिसांना विना कारवाई परतावे लागले.बसस्थानक परिसर सुन्नवाकोद बसस्थानक परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते. जुगार, सट्टा, पत्ता खेळण्यासाठी वाकोद परिसरासह मराठवाड्याची सीमा जवळ असल्याने या परिसरातील मोठ्या प्रमाणावर लोक खेळण्यासाठी येतात. त्यामुळे या परिसरात यात्रेचे स्वरूप असायचे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे.परिसरातील जवळपासच जि.प. शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, कृषी विद्यालय आहे. या ठिकाणी अनेक मुले, मुली बाहेरगावावरून शिक्षणासाठी येतात. यांनादेखील येथूनच ये-जा करावी लागते.अवैध धंदे ‘जैसे थे’वाकोद गावाचे सुपुत्र पद्मश्री स्व.भवरलाल जैन यांनी वाकोदच्या विकासाची सूत्रे हाती घेतली होती, हे गाव तत्कालीन जिल्हाधिकारी प्रकाश सापदे यांनी दत्तक घेतले होते. तेव्हा गावातून अवैध धंदे बंद करण्यासाठी ठराव केला होता, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर वाकोद ग्रा.पं.नेदेखील पहूर पोलीस स्टेशनला येथील अवैध बंद करण्याचे निवेदन दिले होते, त्यानंतर जि.प.सदस्य अमीत देशमुख यांनीदेखील पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती. मात्र ही परिस्थिती ‘जैसे थे’ होती.आॅनलाइन तक्रारीचा धसकाया आॅनलाइन तक्रारीचा धसका बसला असून, गेल्या दोन दिवसांपासून अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
धाडींच्या आधीच ‘अवैध धंद्यांना कुलूप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:23 AM
वाकोद : विद्यार्थ्याच्या एका आॅनलाइन तक्रारीने हलविले पोलीस प्रशासन
ठळक मुद्देवाकोद गावातील एका विद्यार्थ्याने बोकाळलेल्या अवैध धंद्याबाबत ‘आपले सरकार’ या पोर्टलवर गोपनीय तक्रार दिली होती.मिळालेल्या माहितीनुसार शासकीय स्थरावर तक्रारदार कोण हे समजते व तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. मात्र या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्याचे नाव उघड झाल्याने याला धमकविण्याचा प्रयत्नदेखील झाल्याचे समजते.पोलिसांनी धाड टाकण्यापूर्वीच नियोजित जागेवरून पसार होणे तसेच गोपनीय तक्रारदाराचे नाव उघड होणे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.