लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना उपचारांचा एक प्रोटोकॉल आहे, मात्र सद्यस्थितीत सर्दी, खोकला वाढला तरी जनरल प्रॅक्टीशनकडूनही सलाईनद्वारे सरसकट रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात असल्याने मागणी वाढल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर हे इंजेक्शन कोणत्या डॉक्टराने व कोणत्या रुग्णाला लिहून द्यावे, याचे निकष ठरवावे, असे मत आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा, यावर मार्ग काढण्यासाठी दरांबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आयएमए पदाधिकारी तसे केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
बैठकीला आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, माजी सचिव डॉ. अनिल पाटील,डॉ. राजेश पाटील, डॉ. विलास भोळे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. स्नेहल फेगडे यांच्यासह डॉ. तुषार बेंडाळे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव अनिल झंवर, शामकांत वाणी आदी उपस्थित होते. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कृत्रीम टंचाईवर तोडगा कसा काढावा, याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी आयएमए पदाधिकारी तसेच केमिस्ट संघटनेकडून काही सूचना मागविल्या. दरम्यान, या बैठकीत जैविक कचऱ्याबाबत रुग्णालयासाठीचे प्रत्येकी १५ हजार जे दळणवळणाचे दर आकारले जातत ते रद्द करण्याची मागणी आयएमएकडून करण्यात आली. यासह केमिस्ट संघटनेने रेमडेसिविरच्या प्रशासनाने ठरविलेल्या दरांना विरोध केला, मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेल्या दरात या इंजेक्शनची विक्री करावी, असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत स्पष्ट केले.
त्रिस्तरीय नियंत्रण हवे
आयएमएचे नवनियुक्त सचिव डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सूचना मांडल्या त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्न अशी केंद्रीयकृत यंत्रणा हवी. या यंत्रणेत डॉक्टर, केमिस्ट आणि औषध निरीक्षक या तिघांचा समावेश असावा. कोणत्या डॉक्टराने रेमडेसिवीर प्रिस्क्राईब करावे, कोणत्या रुग्णाला ते द्यावे, याचे निकष असावेत. सीटी स्कॅनचा स्कोर ७ पेक्षा अधिक हवा, सीटीस्कॅनचा रिपोर्ट मागून ते दिले गेले पाहिजे. सकाळ, संध्याकाळ रेमडेसीवरचा डाटा घ्या, कुणाला किती दिले, रुग्णांना किती मिळाले. किती शिल्लक आहेत, यामुळे साठेमारी होणार नाही, अशा सुचना डॉ. चौधरी यांनी बैठकीत मांडल्या.