लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआर संस्थेतील गैरव्यवहाराशी संबंधित सूत्रधार आता प्राप्तीकर विभागाच्याही रडारवर आहे. पावत्यांच्या अथवा इतर कोणत्याही माध्यमातून कमाई करीत कर चुकविल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाल्यानंतर प्राप्तीकर विभागाकडून केव्हाही या सूत्रधारांची चौकशी होणार असल्याने त्यांच्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे. विशेष म्हणजे बीएचआरच्या या कारभाराची तक्रार नाशिक प्राप्तीकर विभागाकडे पोहचली होती. या पथकाकडून कारवाइ होणार तितक्यात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाइ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बीएचआर संस्थेत ठेवी मिळणे कठीण झाले असताना अवसायकासह त्यांच्या हस्तकांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे समोर येत आहे.
‘प्राप्तीकर’तयारीत असताना पोहचले आर्थिक गुन्हे शाखेचे पथक
बीएचआर संस्थेतील गैरव्यवहार व त्याद्वारे करण्यात आलेल्या बेसुमार कमाईविषयी प्राप्तीकर विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्या. त्यामुळे हे पथक जळगावात येऊन चौकशीच्या तयारीत असतानाच पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात पोहचले. त्यामुळे प्राप्तीकर विभागाच्या पथकाने सध्या जळगावात येणे टाळले.
कर तर वसूल करणारच
बीएचआर संस्थेत अवसायक असो अथवा इतर कोणीही असो प्रत्येक सूत्रधाराने पावत्या ३० ते ३५ टक्क्याने घेतल्याची माहिती या विभागाला मिळाली. त्यामुळे पावतीच्या फरकाची रक्कम ही एक प्रकारे त्या व्यक्तींनी कमाईच केली असल्याने व त्याचा कर चुकविल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे प्राप्तीकर विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा मंडळींकडून हा कर वसूल केलाच जाईल, त्यामुळे चौकशी अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रधारांच्या कारभाराची घेतली माहिती
बीएचआर संस्थेच पावत्या कशा पद्धतीने घेतल्या जात होत्या अथवा मालमत्ता कशा पद्धतीने खरेदी केल्या जात होत्या, या संस्थेतील कारभाराची माहिती व तो कसा केला जात होता, याची माहिती प्राप्तीकर विभागाकडून घेतली जात आहे. त्यामुळे या चौकशीत अनेकांवर दुहेरी कारवाई राहणार, हे निश्तित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आर्थिक गुन्हे शाखेकडून संकलित माहितीचा आधार
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जी कागदपत्रे गोळा केली आहे व जी चौकशी करीत आहे, त्याची आता प्राप्तीकर विभागाला मदत होणार आहे. जळगावात येऊन अधिक सखोल चौकशी करण्यास यामुळे मदतच होणार असल्याचे सांगितले जात आहे.