जळगाव : कोरोनाची सुरुवात ही डोळ्यांपासून होऊ शकते, कोविडच्या काळात डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा डोळ्यांना संसर्ग होऊन त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच काही वेळा रुग्णाला दृष्टी गमवावी लागेल. त्यामुळे स्वच्छता आणि खबरदारीच्या सर्व उपायांचे पालन करावे, असा सल्ला शहरातील नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला आहे.
आयएमएतर्फे शुक्रवारी कोविड आणि नेत्ररोग या विषयांवर चर्चासत्र पार पडले. त्यात नेत्ररोगतज्ञ डॉ. अंजली चौधरी, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. दर्शना शाह, डॉ. नीलेश चौधरी हे सहभागी झाले होते. उपक्रमासाठी अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी परिश्रम घेतले.
डॉ. अंजली चौधरी म्हणाल्या की, सध्याच्या काळात शस्त्रक्रिया थांबल्याने नेत्रबिंदूच्या आजाराचे प्रमाण वाढून दृष्टीदेखील जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या लसीचा डोळ्यांवर कोणताही परिमाण होत नाही.
डॉ. धर्मेंद्र पाटील म्हणाले की, मोतिबिंदू आणि नासूरची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कोविड चाचणी करणे गरजेचे आहे. डोळ्याबाबत काहीही त्रास असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रुग्णांनी वेळोवेळी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. कोरोनामुळे रक्तवाहिनीत एखादी गाठ झाल्यास त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
डॉ. दर्शना शाह म्हणाल्या की, कोविडमध्ये डोळा लाल होतो. घाण येते, पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, खाज येणे अशी काही लक्षणे आहेत. अश्रूंमध्ये कोरोनाचा संसर्ग असल्याचे प्रमाण ७ टक्केपर्यंत आहे. ऑनलाईन शिक्षण आणि लॉकडाऊनमुळे पालक मुलांच्या डोळ्यांबाबत तक्रारी घेऊन येत आहेत. मोबाईल गेम आणि इतर बाबींपासून लांब राहावे, असे डॉ. दर्शना शाह यांनी सांगितले.
डॉ. नीलेश चौधरी म्हणाले की, म्युकोरमायकोसीसच्या घटना पोस्ट कोविड आजारात वाढल्या आहेत. बुरशीजन्य असलेल्या या आजारात संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास त्यांच्या मृत्यूची शक्यता ५० टक्केपर्यंत असते. शक्यतो गंभीर आजार असलेले रुग्ण आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तिंना हा आजार होतो, असे डॉ. नीलेश चौधरी यांनी सांगितले.