आनंद सुरवाडे : डमी १०४३
जळगाव : लोककलावंत नेहमीच उपेक्षित राहत असल्याची तक्रार होत असताना आता कोविडच्या काळात या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामच बंद असल्याने अखेर काही कलावंत तर गवंडी काम करत आहेत. काही वेगळा पर्यायी व्यवसाय करीत आहे. सरकारी मदत केवळ नावालाच असल्याची स्थिती आहे.
मे महिन्यात कोविड जनजागृतीसाठी या कलावंतांना दहा कार्यक्रमांचे पाच हजार रुपये मदत मिळणार होती. मात्र, कोविडमुळे हे कार्यक्रमही होऊ शकलेले नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी राज्यातील ५६ हजार लोककलावंतांना मानधन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, लोककलावंताची राज्यातील संख्या ही अधिक असल्याचे काही लोककलावंतांचे म्हणणे आहे.
दोन बाबी वेगवेगळ्या
मे महिन्यात निघालेला शासन आदेश आणि शासनाने आता केलेली मदतीची घोषणा या दोन बाबी वेगवेगळ्या आहे. मानधनासाठी नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार राज्यातील ५६ हजार लोककलावंतांना त्याचा लाभ मिळणार आहे.
तर मे महिन्यात निघालेल्या शासन आदेशानुसार कार्यक्रम करू शकणाऱ्या लोककलावंताना एका कार्यक्रमाचे प्रत्येकी ५०० रुपये अशी मदत मिळणार आहे. कोविडसाठी ही जनजागृती त्यांना करायची आहे. मात्र, लॉकडाऊन लागल्यामुळे हे कार्यक्रम घेता आलेले नाही.
या कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयच निवड करणार असून, जिल्हा प्रशासनाला केवळ त्यांना कोठे कार्यक्रम घ्यायचे आहे, याचा तपशील द्यायचा आहे. त्यानुसार त्या गावात कार्यक्रम घेतल्यानंतर संबंधित तलाठी, ग्रामसेवक यांचे पत्र घेऊन ते सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे देऊन या कार्यक्रमांची मदत कलावंताच्या थेट खात्यावर जमा होणार आहे.
मदत हातात उरणार कशी
- शासनाने जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी जी मदत जाहीर केली आहे ती स्वागतार्ह आहेत. मात्र, केवळ तीन लोकांमध्ये कार्यक्रम कसे सादर होणार आहेत. दहा कार्यक्रम केल्यानंतर मदत हातात काय उरणार असा सवाल लोककलावंतांनी उपस्थित केला आहे.
- जिल्ह्यातून ३०० कलावंतांची निवड करा, प्रत्येकी तीन तीनचे गट करून प्रत्येक गावात दहा कार्यक्रम करा असा शासनाचा जीआर आहे. मात्र, हा जीआर किती यशस्वी होईल याबाबत सर्वच कलावंतांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे, असे शाहीर शिवाजीराव पाटील यांनी म्हटले आहे.
- कलावंतांना काम मिळून त्यांना पैसाही मिळेल हा यामागचा उद्देश आहे, मात्र, तो यशस्वी ठरणारा नाही, कारण मानधन हे अतिशय तोकडे असल्याचे लोककलावंतांचे म्हणणे आहे.
कलावंतांची फरफट
शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. ते आनंदादायीच; मात्र जनजागृतीच्या या कार्यक्रमात किमान पाच कलाकारांना परवागनी असावी आणि वीस हजारांचे मानधन हवे. पाच हजार हे दहा कार्यक्रमांसाठी परवडणारे नाहीत.
- शाहीर शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद
शासनाकडून मदत नसल्याने अखेर या कलेवरच कसातरी उदनिर्वाह चालवावा लागत आहे. किंगरी वादन करून कुटुंबाचा गाडा हाकत आहे. शासनाने दखल घेऊन लोककलावंतांना न्याय द्यावा ही अपेक्षा आहे. - पदम भराडी, महिंदळे, ता. भडगाव
जिल्ह्यात ११५ कलावंतांची यादी
- सांस्कृतिक मंत्रालयाकडून मे महिन्यात सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी शासन आदेश काढला आहे. यात स्थानिक कलावंतांना प्राधान्य राहणार आहे. त्यात त्यांना दहा कार्यक्रमांचे पाच हजार रुपये मिळणार आहे.
- यासाठी जिल्ह्यातून ११५ लोककलावंतांची नोंदणी होऊन त्यांची यादी तयार झाल्याची माहिती शाहीर शिवाजीराव पाटील यांनी दिली आहे.
- जिल्ह्यातून जागृतीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची संख्या कमाल ३०० असेल असे जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.