संजय पाटील ।अमळनेर, जि.जळगाव : ‘मुसाफिर हुं यारो... ना घर है... ना ठिकाणा... बस चलते जाना है...’ या गीताप्रमाणे स्वत:च्या सुखी संसाराच्या स्वप्नांना तिलांजली देऊन तो आपल्या गतिमंद भावाच्या आणि स्वत:च्या उपजीविकेसाठी धावत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकण्यासाठी वणवण भटकत असतो.सध्याच्या युगात काही घटनांमध्ये मुलगा विवाहित झाला की तो जन्मदात्या आई-वडिलांनादेखील आश्रमात पोहचवितो. तिथे भाऊ आणि तो जर गतिमंद असेल त्याला कोणीच वागवणार नाही, अशी स्थिती असताना शशीकांत परशुराम चौधरी हा तरुण गेल्या १५ वर्षांपासून रेल्वेस्थानकावर राहून आपल्या गतिमंद भावाला वागवत आहे.शशीकांतचे वय ४० असून, त्याचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. वडिलांची गरिबीची परिस्थिती होती म्हणून ते बर्फाच्या गोळ्याची गाडी चालवत होते. मजुरी करीत होते. शशिकांतचा लहान भाऊ उमाकांत हा गतिमंद आहे. आई-वडिलांमध्ये वैचारिक मतभेद झाले आणि आई माहेरी मामाकडे निघून गेली. १०-१२ वर्षांपूर्वी वडील जगाला सोडून गेले आणि शशिकांत व उमाकांत पोरके झाले. शशिकांत विवाहयोग्य होता. कोठेही जाऊन एखाद्या मुलीशी विवाह करून सुखी संसारात रममाण होऊ शकला असता. मात्र आपल्या गतिमंद भावाचे कसे होईल म्हणून त्याने भावाला तसेच न सोडता त्याची जबाबदारी स्वीकारली. धावत्या रेल्वेत कुल्फी, पाण्याची बाटली, चहा, वडे असे जे मिळेल ते खाद्यपदार्थ विकून दिवसाला १५० ते २०० रुपये कमावतो. राहायला घर नाही म्हणून अमळनेर रेल्वेस्थानकावरच त्याचे अंथरूण एका पोत्यात पडलेले असते. त्याचा गतिमंद भाऊ उमाकांत दिवसभर गावात फिरून सायंकाळी स्टेशनवर भावाची वाट बघत बसलेला असतो. सकाळी जाऊन दुपारी परत येतो. मेसवरून डबा आणला की भावाला जेवू घालतो. पुन्हा सायंकाळी एखादी रेल्वे पकडायची आणि दररोजच्या व्यवसायाला निघून जायचे. शशिकांत कधी रात्री १२ वाजता येतो, तोपर्यंत त्याचा भाऊ तसाच वाट बघत बसलेला असतो. कधी अमळनेरहून मेसचा डबा आणतो तर कधी उशीर झाला तर नंदुरबारहून डबा आणून आपल्या भावासोबतच शशिकांत जेवतो. सकाळी पुन्हा उठला की स्टेशनवरच प्रातर्विधी, आंघोळ करून पुन्हा रेल्वेमध्ये पदार्थ विकायला निघून जातो. दररोज दोन्ही वेळच्या दोघा भावांचा जेवणाचा खर्च १५० ते २०० रुपये लागतो.तरुणांसाठी आदर्शना कुठले ध्येय, ना कुठली उमीद, ना कुठले स्वप्न, ना संसाराची आशा. साऱ्याच स्वप्नांना तिलांजली देऊन तो जगतोय फक्त भावासाठी! जिथे भावभावातील नाती संपली आहेत. आई-वडिलांच्या प्रेमाच्या नात्याला ग्रहण लागले आहे. तिथे शशिकांतसारख्या भावाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आजच्या संस्कृती विसरत चालल्या तरुणांसाठी शशिकांत आदर्श आहे.मला घर नाही. नोकरी नाही. मुलगी कोण देणार? माझ्या भावाला कोण वागवणार? म्हणून मीदेखील आता लग्नाचा विचार सोडला आहे.-शशीकांत परशुराम चौधरी, अमळनेर
अमळनेरातील भावंडांचा रेल्वेत आशियाना, स्टेशनवर बिछाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:14 AM
मुसाफिर हुं यारो... ना घर है... ना ठिकाणा... बस चलते जाना है...’ या गीताप्रमाणे स्वत:च्या सुखी संसाराच्या स्वप्नांना तिलांजली देऊन तो आपल्या गतिमंद भावाच्या आणि स्वत:च्या उपजीविकेसाठी धावत्या रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकण्यासाठी वणवण भटकत असतो.
ठळक मुद्देदोन भावांची कहाणीगतिमंद भावासाठी संसाराच्या स्वप्नांना तिलांजली