अमळनेर (जि.जळगाव) : शहरात शुक्रवारी रात्री दंगल उसळून दोन गटात तुफान दगडफेक झाली. एका पोलीस अधिकाऱ्यावर तलवार हल्ला करण्यात आला. दगडफेकीत तीन अधिकारी व तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील ६१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर २९ जणांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी तीन दिवसांसाठी १४४ कलम प्रमाणे संचारबंदी लागू केली आहे.
९ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिनगर गल्लीत दोन गटात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख पोलीस ताफ्यासह हजर झाले. काही वेळात प्रभारी अधिकारी रामदास वाकोडे, पारोळा पोलिसांसह हजर झाले. तेव्हा दोन्ही गटाच्या हातात लाठ्या- काठ्या दगड होते. पोलीस त्यांना शांततेचे आवाहन करीत असताना जमावाने घोषणाबाजी केली आणि पोलिसांवर फरश्या व दगडांनी हल्ला चढवला. इरफान जहुर बेलदार याने तलवारीने सपोनि राकेशसिंग परदेशी यांच्यावर वार केला, त्यांनी तो चुकवला. पण त्यांच्या पायाला लागून हाड फ्रॅक्चर झाले. तसेच जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक देशमुख, हितेश बेहरे, राहुल पाटील, धुळे आरसीएफचे अनिल सोनवणे ,मगनराव घटे हे पोलिस कर्मचारी जखमी झाले.
पानखिडकी भागात इलेक्ट्रिक डीपीवर आणि घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. त्यांनतर लागलीच खड्डा जीन भागात दुसऱ्या गटाने दगडफेक केली. काही वेळात जुना पारधीवाडा भागात दगडफेक झाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर , चोपडा डीवायएसपी कृषिकेश रावळे यांनी रात्री पाहणी केली.
रात्रीच २९ जणांना ताब्यात घेण्यात आले. ६१ जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.