या पार्श्वभूमीवर येथील आगामी पालिका, खान्देश शिक्षण मंडळ, अर्बन बँक आदी अल्पावधीतच होणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. या इच्छुक उमेदवारांमध्ये इलेक्टिंग मेरिट असणारे आणि भविष्यात विधानसभा व लोकसभा या महत्त्वपूर्ण निवडणुकांमध्ये उपयुक्त ठरू शकणाऱ्यांची चाचपणी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार शिरीष चौधरी, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील व ॲड.ललिता पाटील आदी नेते मंडळी गुप्तपणे व सुप्तपणे करीत आहेत. अर्थात, पालिका, खान्देश शिक्षण मंडळ व अर्बन बँकेच्या निवडणुकांमध्ये ही मंडळी कोणती भूमिका घेणार, याबाबत सारे काही अद्याप गुलदस्त्यातच आहे. काही मोठे नेते पक्ष बदल करतील, तर काही जुने विरोधक हातात हात घेतील, अशा चर्चा रंगत आहेत.
राजकीय पदप्राप्तीची इच्छा पूर्ती व्हावी, म्हणून इच्छुक उमेदवार साम-दाम-दंड-भेद सह विविध कल्पक युक्त्या व क्लुप्त्याही वापरत आहेत. त्यातील एक म्हणजे ज्यांचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस असतो त्यांना शुभेच्छा देणारे किंवा दिवंगतांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर फेसबुक तथा व्हॉट्सअप वरून प्रसारित करणे, ज्यांचे वाढदिवस असतील, त्यांना फोनवरून किंवा समक्ष भेटून शुभेच्छा देणे, आता काहींनी नियमितपणे सुरू केले आहे. ज्यांचे बॅनर फेसबुक किंवा व्हॉट्सअप वर झळकते, ती मंडळी व त्यांचे आप्तस्वकीयही मनोमन सुखावतात. त्यातून त्यांची शुभेच्छा देणाऱ्यांच्या तथा श्रद्धांजली वाहणाऱ्यांच्या प्रती भावनिक जवळीकता दृढ होते आणि हीच जवळीकता निवडणुकीत करिष्मा दाखविते.
हल्ली अमळनेरमध्ये या बॅनरबाजीच्या फंड्याची चांगलीच चर्चा आहे.
वार्तापत्र डिगंबर महाले