अमळनेर आगाराची बस (एमएच२०/बीएल१४१८) ही सोनगीरहून अमळनेरकडे येत असताना, वालखेडा गावाजवळ वालखेडाकडून सोनगीरकडे जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी रिक्षा चालकाने बसला कट मारल्याने, बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. या बसमध्ये सोनगीरहून अमळनेरकडे येणारे १८ प्रवासी प्रवास करीत होते. त्यात वाहक संदीप लोहार यांना डाव्या बाजूचा खांद्याला किरकोळ मार लागला, तर प्रवासी वजाबाई पवार व गोकुळ पवार यांना पायाला किरकोळ मार लागला.
घटनेची माहिती मिळताच, आजूबाजूच्या परिसरात शेतात काम करणाऱ्या वालखेडा येथील शेतकरी व मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन, सर्व प्रवाशांना बसच्या मागील बाजूची काच फोडून बाहेर काढले. यावेळी शिंदखेडा आगारातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन, दोन्ही जखमी प्रवाशांना वाहकाडून पैसे घेऊन पंधराशे रुपयांची तातडीची मदत दिली, तर बसमध्ये असलेल्या प्रवाशांना मागून येणाऱ्या अमळनेर आगाराच्या बसमध्ये बसवून त्यांना पुढे रवाना केले. यावेळी नरडाना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सदरील घटनेचा पंचनामा केला.