15 हजार पुरणपोळ्यांचे संकलन : मिनीट्रक रवाना
अमळनेर, दि.29-आळंदी (देवाची) येथील स्वानंद सुकनिवासी जोग महाराज संस्थापीठ वारकरी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभरापासून सुरु असलेल्या अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाच्या सांगतेसाठी अमळनेर येथून तब्बल 15 हजार पुरणपोळ्या मिनी ट्रकमध्ये रवाना केल्या आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहणा:या भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद देण्यात येणार होता.
अमळनेरातूनही पुरणपोळ्या देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील महिलांनी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारासच पुरणपोळ्या तयार करून त्या अमळनेरला स्वयंसेवकांच्या माध्यमातून आणून दिल्या. केवळ अमळनेर तालुक्यातूनच नाही, तर जिल्ह्यातील इतर तालुक्यातूनही भाविकांनी पुरणपोळ्या आणुन दिल्या. गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीमंगळदेव ग्रह मंदिरात जवळपास 15 हजारहून अधिक पुरणपोळ्या जमा झाल्या. या पुरणपोळ्या मंगळग्रह मंदिराच्या माध्यमातून आळंदी (देवाची) येथे मिनीट्रक द्वारे पाठविण्यात आल्या आहेत. केवळ पुरणपोळ्याच नाही तर भाविकांनी कुरडया, पापडही आणून दिले होते.