अमळनेर, जि.जळगाव : येथील कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.कृषी विभागाच्या एकूणच कार्यप्रणालीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.येथील कृषी विभागाचे कार्यालय अनेक वर्षे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या न्यू प्लॉट भागातील डॉ.संदेश गुजराथी यांच्या रुग्णालयासमोरील इमारतीत होते. आता हे कार्यालय पटवारी कॉलनी भागातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ नुकतेच स्थलांतरित झाले आहे.स्थलांतर करताना कृषी विभागाने त्यांच्या जुन्या कार्यालयातील बी-बियाणे व खताच्या छोट्या अनेक पिशव्या, दस्तावेज, नियतकालिके, माहिती पत्रके आदींना कचरा कुंडीत न टाकता किंवा पालिकेच्या कचरा गाडीत न टाकता थेट रस्त्यावर टाकले. त्यास आग लावून निघून गेले. हा ढिगारा पूर्ण जळाला की नाही हे पाहण्याचाही त्रासही त्यांनी घेतला नाही. परिणामी या अर्धवट जळालेल्या ढिगाऱ्यातून अत्यंत घाणेरडा व आरोग्यासाठी हानिकारक असलेला वास आजूबाजूच्या नागरी वस्तीत पसरत आहे. येणाºया-जाणाऱ्यांनाही या दुर्गंधीचा त्रास होत आहे. ही बाब ११ रोजी सामाजिक कार्यकर्ते आशीष चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत कृषी विभागाला कळविले. मात्र अजूनही हा दुर्गंधीयुक्त ढिगारा ‘जैसे थे’ आहे.बियाणे व खतांची पाकिटे गरजू शेतकºयांना वाटण्याऐवजी त्यांना अशा पद्धतीने नष्ट का करण्यात आले? माहिती पत्रके व नियतकालिकांचे पुरेसे वाटप का झाले नाही? अनेकांच्या सह्या असलेले दस्तावेज अशाप्रकारे का नष्ट केले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
अमळनेरला कृषी विभागाने केली स्वच्छ भारत अभियानाची ऐसी तैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:27 PM