संजय पाटीलअमळनेर : तालुक्यात वाळू चोरीचे प्रमाण वाढले असून, वाळू चोरट्यांची मुजोरी थांबवण्यासाठी पोलीस, महसूल आणि आरटीओ अशा तिन्ही विभागातर्फे संयुक्त कारवाई करा, असे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी बैठकीत देताच अवघ्या काही तासात अमळनेरात अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्यात आली. काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई करून वाहन पळवणाऱ्या दोन जणांंना अटक करण्यात आली.१९ रोजी सकाळी अकराला प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी डीवायएसपी राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, आरटीओ विकास सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवडचे सपोनि राहुल फुला, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, राजेंद्र माळी, राहुल लबडे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी अहिरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी वाळूमाफियांना वेसन घालण्यासाठी दिलेल्या आदेशाचा संदर्भ घेत अमळनेरात २४ तास वाळूचे टेम्पो सुरू असून, ट्रॅक्टर व डम्परदेखील जोरात सुरू आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास करून चोरत्यांनी महसूल कर्मचारी व नागरिकांनादेखील दादागिरी सुरू केली आहे. त्यांची मुजोरी थांबवा, तिन्ही विभागातर्फे संयुक्त कारवाई करा, असे आदेश दिले.गेल्या काही दिवसांपासून वाळू चोरांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, टेम्पोवर कठोर कारवाई न करता सोडून देणे, काही वाहने रस्त्यात सोडून देणे असे प्रकार घडत होते. तक्रार केल्यानंतरही वेळेवर न पोहचल्याने वाळू चोरांना पळण्याची संधी मिळणे, रात्री नाईट राऊंडला वाळू चोरांच्या खबरीकडे दुर्लक्ष करणे, विनानंबरच्या टेम्पोंवर कारवाई न करता सोडून देणे आदीबाबत सामान्य नागरिकांची ओरड होती. मात्र तक्रारदारांना वाळू चोरांकडून त्रास व्हायचा. परंतु कारवाई होत नव्हती. म्हणून नागरिकांत भीती निर्माण झाली होती. मात्र जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व प्रांताधिकारी यांनी कठोर पावले उचलली आणि बैठकीनंतर अवघ्या काही तासात तहसीलदार मिलिंद वाघ यांनी पोलीस व आरटीओ यांना सोबत घेऊन लगेच चार वाहनांवर कारवाई केली आहे.संयुक्त पथकाने पारोळा रोड, फापोरे रोड आदी भागात छापे टाकले. अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी प्रवीण पाटील यांचे एमएच-२७-बीबी-२८४७, जावेद पठाण यांचे एमएच-१९-एएन-३११२, संतोष पवार त्यांचे जेएटी ४३८, तर नोंदणी नसलेले सुलतानखान रहीमखान यांचे ट्रॅक्टर पकडून त्यांना अमळनेर एसटी आगारात जमा करण्यात आले आहे.वाहन पळवणाऱ्या दोघांना अटकदरम्यान, तहसील कार्यालयात जमा केलेला महेंद्र महाजन यांचा लाल रंगाचा टेम्पो तहसील आवारातून पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्हेरे येथील श्यामकांत नरेंद्र पाटील व पुंडलिक साहेबराव पाटील यांना तहसीलदार मिलिंद वाघ, मंडलाधिकारी पुरुषोत्तम पाटील, संदीप पाटील यांनी रंगेहात पकडले. दोघांच्या तोंडातून दारूचा वास येत होता. संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, कैलास शिंदे तपास करीत आहे.
अमळनेरात काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई, वाहन पळवणारे दोन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 9:20 PM
काही तासात चार ट्रॅक्टरवर कारवाई करून वाहन पळवणाऱ्या दोन जणांंना अटक करण्यात आली.
ठळक मुद्देवाळू चोरांची मुजोरी थांबवण्यासाठी संयुक्त कारवाई कराबैठकीत प्रांतांचे आदेश