जळगाव : फेसबुकवर मैत्री, त्यानंतर अश्लील व्हिडिओ कॉल व याच व्हिडिओच्या माध्यमातून अमळनेरच्या एका ५० वर्षीय डॉक्टरला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून दीड हजार रुपये उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरने पोलिसांकडे धाव घातल्याने मोठी फसवणूक टळली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील एका डॉक्टरची तीन दिवसांपूर्वी फेसबुकवर एका महिलेशी मैत्री झाली. त्यातून या महिलेने डॉक्टरला व्हाॅट्सॲप नंबर मागितला. त्यानंतर दोघांचे व्हाॅट्सॲपवर चॅटिंग होत असतानाच अश्लील बोलणे झाले. त्याच्या पुढे जाऊन या महिलेने डॉक्टरला व्हिडिओ कॉल करून अश्लील वर्तन केले. डॉक्टरनेही महिलेला प्रतिसाद देत अश्लील कृत्य केले. या महिलेने हा व्हिडिओ सेव्ह करून पाच मिनिटांत डॉक्टरला पाठविला. माझ्या बँक खात्यावर तत्काळ तीन हजार रुपये पाठवा, नाही तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या डॉक्टरने आधी एक हजार रुपये व नंतर पाचशे रुपये असे दीड हजार रुपये त्या महिलेच्या बँक खात्यात पाठविले. आपली फसवणूक होत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरने फेसबुक खाते बंद केले. त्यानंतर त्यांच्या व्हाॅट्सॲपवर सोशल मीडिया सेलचे सरकारी अधिकारी असल्याचे सांगून एका व्यक्तीने स्वतःचे ओळखपत्र पाठविले. तुमच्यावर कारवाई करतो म्हणून त्यांनी दम दिला.
पोलीस अधीक्षकांकडे कथन केली आपबिती
घाबरलेल्या डॉक्टरने सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. तेथे त्यांच्यावर बेतलेला प्रसंग कथन केला. हा प्रकार पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या कानावर गेला. त्यांनी चौकशीसाठी एक यंत्रणा कामाला लावली. चौकशीत डॉक्टरने ज्या बँक खात्यावर पैसे पाठविले, ते पाँडेचेरी येथील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सरकारी अधिकाऱ्याचे ओळखपत्रही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी केलेली मदत व सोशल मीडियाचे सर्व खाते ब्लॉक केल्यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला.
६५ वर्षीय वकीलही शिकार
डॉक्टर ज्या पद्धतीने सेक्सटाॅर्शनचे बळी ठरले, त्याच पद्धतीने काही महिन्यापूर्वी ६५ वर्षीय वकीलही याचे शिकार झाले होते. त्यानंतर ३५ वर्षीय वकिलावरही असाच प्रसंग बेतला होता.
कोट..
सोशल मीडियाचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे फेसबुकवर अनोळखी महिलेची रिक्वेस्ट स्वीकारू नये तसेच कोणीही व्हाॅट्सॲप नंबर मागितला तर त्यांना देऊ नका. चुकून तसा प्रकार घडला तरीही कोणाच्याही बँक खात्यावर पैसे पाठवू नका. फेसबुक वापरताना विशेष दक्षता घ्यावी.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक