घरातला कचरा नदी पात्रात
अमळनेर नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरा गोळा करणाऱ्या गाड्या गल्लीत येत असतानादेखील काही लोक त्यात कचरा न टाकता सरळ नदी पात्रात टाकून जलप्रदूषण वाढवत आहेत. खळेश्वर परिसरातील गावठी दारूची विषारी रसायने तसेच, दारूच्या रिकाम्या झालेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या नदी पात्रात टाकल्या जातात. चिकन विक्रेते कोंबड्यांची पिसे व इतर घाण नदी पात्रात फेकतात. थर्माकोल, केस कर्तनालयाचे केस, प्लॅस्टिक पिशव्या आदी कचरा नदी पात्रात फेकून प्रदूषण वाढवले जात आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
बोरी नदी म्हणजे अमळनेर शहराचे वैभव. नदी पात्रातच वाडी संस्थानचे मंदिर आहे. मे महिन्यात येथील वाळवंटात मोठी यात्रा भरते. राज्यातील विविध भागातील भक्तगण यात्रोत्सवाला हजेरी लावतात. दोन वर्षे कोविड-१९मुळे यात्रोत्सव होऊ शकला नाही. याची खंत भक्तगणांना आहे. मात्र पात्राची अवस्था दिवसेंदिवस अतिशय क्लेशदायक ठरत आहे. विशेष म्हणजे पर्यावरणप्रेमीही याबाबत बोलायला तयार नाहीत.
----
नगर परिषदेने काम हाती घ्यावे
१-शहराचे वैभव ठरत असलेल्या बोरीच्या पात्रात अन्य वेळी नागरिक फिरायला येतात. आता मात्र या ठिकाणी दुर्गंधीचा सामना करावा लागत असतो.
२- नगर परिषदेने पूर्वी नदी पात्र स्वच्छ करण्यासाठी जेसीबीने काम सुरू केले होते. नंतर मात्र नागरिक साथ देत नसल्यामुळे हे काम बंद पडले.
३- शहरातील सांडपाणी भुयारी गटारीच्या माध्यमातून अन्यत्र वळविणे आवश्यक आहे. पालिकेने त्यासाठी नियोजन करणे गरजेचे असल्याचेही बोलले जात आहे.