अमळनेर : काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे शहराचे वैभव असलेला एतिहासिक दगडी दरवाजाचा एक भाग कोसळला. त्यामुळे दरवाजाची तातडीने पुनर्बांधणी करून संवर्धन करण्याचे आदेश पुरातत्व खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी दिल आहेत.आठ दिवसांपूर्वी शहरात संततधार पाऊस झाल्याने शहरातील ऐतिहासिक दरवाजाचा एक भाग अचानक कोसळल्याने शहराच्या ऐतिहासिक वैभवाची हानी झाली. या दरवाजाचे लवकरच पुनर्निर्माण व्हावे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. प्रत्यक्षात हा दरवाजा अजून कोसळण्याची भीती असल्याने आ़ स्मिता वाघ यांनी पुरातत्व खात्याचे मंत्री विनोद तावडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यासंदर्भात लेखी स्वरूपात निवेदन देऊन दरवाजाची पुनर्बांध़णी करण्याची मागणी केली होती. या अगोदरही दरवाजाच्या स्थितीसंदर्भात पुरातत्त्व विभागाला कळविण्यात आले होते. पंरतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळेच हा दरवाजा पूर्णपणे कोसळण्याच्या स्थितीत आहे.दरम्यान, तावडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून याबाबत तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले. यामुळे हा ऐतिहासिक दगडी दरवाजा लवकरच नव्या रुपात उभा राहणार, असा विश्वास आ़ वाघ यांनी व्यक्त केला आह़े सध्या अमळनेर शहराची वाहतूक दगडी दरवाजाकडून बंद करण्यात आली असून, ती राणी लक्ष्मीबाई चौकातून वळविण्यात आली आहे़
अमळनेरातील ऐतिहासिक दगडी दरवाजाची होणार पुनर्बांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:45 AM