ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.25 - स्त्रियांच्या समस्यांचे, व्यथा-वेदनांचे वैश्विक प्रतिनिधीत्व करणारी अमिना ही नायिकाप्रधान कादंबरी आहे. आफ्रिकेतल्या नायजेरियासारख्या देशातील बकारो शहरातील हे वास्तव लेखक मोहंमद उमर यांनी मांडले आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्राचार्य डॉ.किसन पाटील यांनी सुखदेव वाघ यांनी अहिराणीत अनुवादित केलेल्या या पहिल्या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी केले.
साहित्यदिप महाराष्ट्र साहित्य परिषद जळगावतर्फे अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोहम्मद उमर यांच्या अमिना या सुखदेव वाघ यांनी अहिराणी बोलीभाषेत अनुवादित केलेल्या कादंबरीचे प्रकाशन प्रा.सी.एस.पाटील, डॉ. किसन पाटील, डॉ.प्रकाश सपकाळे, चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्यविषयीची आस्था असणा:या सर्वानी एकत्र येऊन दर महिन्याला चर्चा आणि कार्यक्रम घडवून आणावेत, नवागतांना प्रेरणा मिळावी यासाठी साहित्यदीप महाराष्ट्र परिषद जळगावतर्फे विविध कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. व्यासपीठावर कादंबरीचे प्रकाशक अथर्व प्रकाशनचे युवराज माळी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी रा.शे. साळुंखे होते. यात विशाल पाटील, गोविंद देवरे, भीमराव सोनवणे, प्रफुल्ल पाटील, उदय येशे, गणेश सूर्यवंशी, आर.डी. चव्हाण, गोविंद पाटील, श.मु.चौधरी, रफिक पटवे, डॉ. प्रकाश सपकाळे, डॉ. किसन पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा.सत्यजित साळवे तर आभारप्रदर्शन योगेश महाले यांनी केले.