महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव शहरात आगमन होताच अमित ठाकरे यांचे जळगाव जिल्हा मनसेच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने तब्बल १५० किलोचा हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नृत्य करत ठेका धरला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाची पूर्णबांधणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे हे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच आल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा जोश आणि उत्साह संचारला आहे.
अमित ठाकरे यांचे हॉटेल रॉयल पॅलेस येथे पारंपरिक वेशभूषेतील पदाधिकारी महिलांच्या वतीने औक्षण करण्यात येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान मध्यवर्ती चौकात अमित ठाकरे यांच्या स्वागत समारंभामुळे या ठिकाणच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळाला. शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली एक खाजगी बससुद्धा या स्वागत समारंभामुळे अडकून पडली. तब्बल अर्धा ते पाऊण तासानंतर या ठिकाणची वाहतूक पोलिसांच्या वतीने सुरळीत करण्यात आली.