सुविधा : प्रेरणा एक्स्प्रेसही ७ जुलै पासून पूर्ववत होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्थगित केलेल्या गाड्या पुन्हा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सेवाग्राम एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मंगळवारी पुन्हा अमरावती-मुंबई एक्स्प्रेस व प्रेरणा एक्स्प्रेससह इतर तीन साप्ताहिक गाड्या जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या गाड्यांची गर्दी कमी होणार असून, प्रवाशांना तत्काळ आरक्षण तिकीट मिळणे सोयीचे होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा मे महिन्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या लॉकडाऊनच्या काळात सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस यासह राजधानी एक्स्प्रेसच्या फेऱ्या आठवड्यातून चारच दिवस केल्या होत्या. मात्र, कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शासनाने ७ जूनपासून लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात कमी केले होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बाजारपेठा, उद्योग-व्यवसाय पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनानेही स्थगित केलेल्या गाड्या पुन्हा १ जुलैपासून टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०२१११-१२), प्रेरणा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०११३७-३८), दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०२१४७-४८), पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०२०३५-३६) आणि पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०२११७-१८) या गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये काही गाड्या साप्ताहिक धावणाऱ्या आहेत.
इन्फो :
या गाड्यांनाही तिकीट आरक्षण सक्तीचेच
रेल्वे प्रशासनाने १ जुलैपासून सुरू करण्यात येणाऱ्या या गाड्यांनाही तिकीट आरक्षण सक्तीचे केले आहे. जनरल तिकीट बंद केले आहे. ज्या प्रवाशांजवळ तिकीट कन्फर्म असेल, अशाच प्रवाशांना गाडीत प्रवासाची मुभा राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून जनरल तिकीटला बंदी असल्याने, प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.