आगार प्रशासनातर्फे कोरोनाबाबत जनजागृती
जळगाव : जळगाव आगार प्रशासनातर्फे कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टनिंगचे पालन करणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मास्क असलेल्या प्रवाशांनाच बस मध्ये प्रवेश देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक बसचे बाहेरगावाहुन आल्यानंतर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : शहरातील शनीपेठेत करण्यात आलेल्या भुयारी गटारींच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना वाहन धारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी, परिसरातील रहिवाशांमधून केली जात आहे.
उघड्यावरील डीपीमुळे अपघाताचा धोका
जळगाव : महावितरणतर्फे शहरात उघड्या डीपीना जाळी बसविण्यात आली असली तरी, नवीपेठेत काही ठिकाणी डीपी उघड्याच आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरी महावितरण प्रशासनाने तातडीने या ठिकाणी जाळी बसविण्याची मागणी परिसरातील रहिवाशांमधून केली जात आहे.
गांधी मार्केटमध्ये अस्वच्छता
जळगाव : गांधी मार्केट मध्ये व रस्त्यावर नियमित साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. सध्या मार्केट बंद असले तरी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरीकांमधून केली जात आहे.