सुविधा : मात्र मुंबईकडे जाणारे वेळापत्रक बदलल्याने चाकरमान्यांची गैरसोय
जळगाव : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस येत्या १६ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे पंजाब प्रातांत जणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, दुसरीकडे मात्र या गाडीचे मुंबईकडे जाताना वेळापत्रक बदलल्यामुळे नेहमी अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर गाड्यांप्रमाणे ही गाडीही सुरू करण्याबाबत प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येत होती. मात्र, कोरोनामुळे वारंवार ही गाडी रद्द करण्यात येत होती. गेल्या दोन महिन्यांत ही गाडी दोनदा रद्द करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात यंदा १० एप्रिलपासून चालविण्याचे जाहीर केले होते. मात्र, तांत्रिक कारण सांगून रेल्वे प्रशासनातर्फे दोनच दिवसांत ही गाडी स्थगित करून, २० एप्रिलपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ज्या प्रवाशांनी १० एप्रिलचे तिकीट बुकिंग केले होते, त्यांना पुन्हा ही तिकिटे रद्द करून, २० एप्रिलची तिकिटे काढावी लागली, तर रेल्वे प्रशासनातर्फे पुन्हा चार दिवसांनी प्रसिद्धी पत्रक काढून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २० एप्रिलपासून सुरू होणारी गाडी पुन्हा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
इन्फो :
वेळापत्रकात बदल झाल्याने चाकरमान्यांची गैरसोय
जळगाव मार्गे मुंबई ते पंजाब प्रांतादरम्यान धावणारी ही पंजाब एक्स्प्रेस पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पंजाबहून जळगावला सायंकाळी साडेसात वाजता यायची. ज्यामुळे जळगाव शहरात काम करणारा पाचोरा, चाळीसगाव येथील हजारो नोकरदार वर्ग सायंकाळी या गाडीने घराकडे परतायचा. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी जळगावला सायंकाळी पाच वाजताच येणार असल्यामुळे पाचोरा व चाळीसगाव येथील नोकरदार वर्ग व चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीची पूर्वीप्रमाणे वेळ ठेवण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे.