वार्तापत्र क्राईम
सुनील पाटील
अमृत योजनेचा वाहतुकीला फटका
शहरात अमृत या पाणी योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गल्लोगल्ली आणि प्रमुख रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत. रस्त्यावर माती झाल्याने धुरळा तर उडतच आहे. त्याशिवाय प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यात भर म्हणून आणखी शहरातील सर्वच सिग्नल यंत्रणा या योजनेमुळे बंद पडल्या आहेत. खोदकामामुळे सिग्नलच्या वायरिंग तुटलेल्या आहेत. त्यामुळे सिग्नल बंद झाले, परिणामी वाहतुकीला शिस्त लावणे शक्य होत नाही. आधीच नियम न पाळणाऱ्यांची संख्या मोठी, त्यात ही समस्या निर्माण झाली. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले, तेथील वायरिंग दुरुस्ती करुन सिग्नल सुरु करुन देण्याची जबाबदारी महापालिका किंवा कंत्राटदाराची आहे, परंत, त्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. वास्तविक वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा ६० टक्के हिस्सा हा महापालिकेलाच मिळतो, त्यामुळे त्यांचीच प्रमुख जबाबदारी आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. काम झाल्यानंतरदेखील खड्डे बुजविले जात नसल्याची ओरड होत आहे. या खोदकामामुळे शहरात धूळच धूळ झाली आहे. दुचाकी व पादचाऱ्यांची तर अवस्था अत्यंत वाईट आहे. शहरातील गर्दीचे पॉईंट तसेच महामार्गावरील सिग्नल यंत्रणा सुरु कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.