कुंदन पाटील
जळगाव : ‘धनगड’ की ‘धनगर’ यासाठी वर्षोनुवर्षे सुरु असलेल्या लढ्याविषयी प्रबोधन करण्यासाठी येथील अल्पबचत भवनात समाजबांधवांचा रविवारी मेळावा झाला. या मेळाव्यात न्यायालयीन लढा देण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे महासचिव डॉ.जे.पी.बघेल यांनी केले.
व्यासपीठावर न्यायालयीन लढ्यातील कायदेशीर सल्लागार मुरार पाचपोळ, राज्य संघटक चंद्रशेखर सोनवणे, राज्य सचीव सुधाकर शेळके यांच्यासह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. दि.१० ते १३ एप्रिलदरम्यान मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयातील निवाड्यानंतर मंचच्यावतीने आरक्षणासाठी पाठपुरावा सुरुच राहणार आहे. त्यासंदर्भातील प्रवास बघेल यांनी उपस्थितांसमोर मांडला. तर आतापर्यंतच्या प्रवासात उपलब्ध केलेल्या दस्ताऐवजाविषयीची माहिती पाचपोळ यांनी दिली. यावेळी मान्यवरांसह समाजबांधवांनी आरक्षणासंदर्भात मत व्यक्त केले. जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.