विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शेतातील झोपडीसमोर खेळत असताना विजेच्या खांबाला स्पर्श झाला व विजेचा धक्का लागल्याने बावली रुमला पावरा (३ वर्षे, रा. नशिराबाद) या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील नशिराबाद शिवारात रविवार, १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सोबत असलेल्या मोठ्या बहिणी बचावल्या. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रुमला पावरा हे आई, वडील, पत्नी आणि तीन मुलींसोबत झोपडी करून वास्तव्याला आहेत. त्यांच्या घराच्या बाजूने वीज तारा गेलेल्या आहेत. पावरा आणि त्याचे आई-वडील यांच्या मिळून दोन झोपड्या आहेत. रुमला पावरा हे कामानिमित्ताने बाहेरगावी गेलेले होते. रविवार, १६ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांची सर्वांत लहान मुलगी बावली ही आपल्या दोन मोठ्या बहिणींसोबत झोपडीजवळ खेळत होती. त्यावेळी लोखंडी खांबामध्ये विजेचा प्रवाह उतरलेला होता. बावली ही खेळत असताना तिचा विजेच्या खांबाला स्पर्श झाला व तिला विजेचा जबर धक्का बसला. नातेवाइकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.