चाळीसगाव/ भडगाव / पाचोरा : तब्बल १५ दिवसांच्या बहुप्रतीक्षेनंतर गुरुवारी गिरणा परिसरात आनंदसरी कोसळल्या आणि शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला. काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
भडगाव परिसरासह तालुक्यातही काही गावांमध्ये रिमझिम पाऊस झाला. काही त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. खेडगाव, ता. भडगाव परिसरात गुरुवारी संध्याकाळी ६-३० वाजता आभाळ भरून येत जवळजवळ १५ मिनिटे रिमझिम पाऊस झाला. अनेक दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ, असह्य उकाडा व अंगातून घामाच्या धारा निघत होत्या.
खेडगावचा अपवाद वगळता काही भागात पिके ऊन धरू लागले होते. हलक्या जमिनीवरील पीक माना टाकण्याबरोबरच करपू लागले होते. गुरुवारच्या रिमझिम पावसाने आता पाऊस येता झाला.
पाचोरा
पाचोरा येथे गुरुवारी सायंकाळी तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने
पाचोरा शहरासह काही भागात पिकांना जीवदान मिळाले. यामुळे काही अंशी दुबार पेरणीचे संकट टळल्याने समाधान व्यक्त होत आहे. हा पाऊस म्हणजे योग्यवेळी सलाईन दिल्यासारखे झाल्याने पिके वाचली, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून आली.
वरखेडी परिसर
वरखेडी, ता. पाचोरा येथे रात्री ८:३५ वाजता पावसाने सौम्य हजेरी लावली. त्यानंतर वरखेडी व परिसरात १० ते १५ मिनिटांच्या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला.
गणेशपूर पिंपरी परिसरात दमदार झाला. मोठ्या विश्रांतीनंतर गुढ्यात सायंकाळी ७ वाजेपासून जोरदार पाऊस झाला. उंबरखेड परिसरात आजही पावसाने हुलकावणी दिली. फक्त शिडकावा झाला. सामनेर परिसरात पावसाने शेतकरी वर्ग आनंदला आहे. महिंदळे परिसरातही तुरळक पावसाची हजेरी लावली.
सायगांव येथे पावसाचा शिडकावा झाला. आडगांव परिसरातही सौम्य पाऊस झाला. रिमझिम पाऊस सुरू झाला असला तरी शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे. वाघडू येथेही शिडकावा झाला. भातखंडे बुद्रूक येथे पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. सातगाव डोंगरीसह परिसरात मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला आहे.