कुजबुज
पुढारी म्हटले की भाषणे आली... यात ते काय बोलतील याचा नेम नाही आणि त्यांच्या बोलण्याचा नेम कुणावर असतो... याचा क्वचित थांगपत्ता ही मंडळी लागू देते.. इतके ते हुशार असतात... असाच एका पक्षाच्यावतीने सेवा व समर्पणाचा कार्यक्रम झाला. सर्वांचे सत्कार झाले. यातील एका वक्त्याने जोरदार भाषण केले आणि वाहवा मिळविली पण रोख कोणावर होता हे काही कळले नाही. भाषणही मजेशीर होते. त्यांच्याच म्हणण्यानुसार, हल्ली आमच्याकडे भाऊंचा वाढदिवस म्हणून भाऊंच्याच खिशातून खर्च करून कार्यकर्त्यांचे फोटो होर्डिग्जवर लावले जातात. भाऊंचेच हारतुरे कार्यकर्त्यांच्या हातात देऊन ‘चला भाऊ येतायं... सत्कार करून घ्या..!’ असे म्हणत सत्कार करवून घेतले जात आहेत. मग यात कसले आले
समर्पण अन् कसली सेवा..? असे या पदाधिकाऱ्याने सांगताच समोर बसलेले एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात समोर बसलेला एक जण उभा राहिला आणि नेमके काय केले पाहिजे ते तरी सांगा.... त्यावेळी स्वत:ला सावरत पदाधिकाऱ्याने ते दुसरे भाऊ असल्याचे सांगताच
अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भाऊ आणि हारतुऱ्यांची कार्यक्रमानंतर चांगलीच चर्चा रंगली. - किरण चौधरी