लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पत्नी व मुलांची तीन महिन्यांपासून तर आई-वडिलांनी दोन महिने मुलाच्या घरी राहूनही त्यांच्याशी भेट न झालेल्या शहीद मिलिंद यांचे पार्थिव बोराळे येथे येताच पत्नी आणि त्यांच्या आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून तापीकाठही गहिवरला. या वेळी उपस्थितांनी आपल्या अश्रूंना जागा मोकळी करून दिली.शहीद मिलिंद खैरनार यांचे वास्तव्य चंदीगड येथे होते. परंतु ड्यूटीसाठी ते जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्तीला होते. तीन महिन्यांपूर्वी ते पत्नी व मुलांना भेटून आपल्या कर्तव्यावर गेले होते. या दरम्यान त्यांचा पत्नी, मुलांशी नियमित संवाद होत होता. आई-वडीलदेखील त्यांना भेटण्यासाठी दोन महिन्यांपासून चंदीगड येथे गेले होते.परंतु हवाईदलाच्या विशेष कमांडो फोर्समध्ये मिलिंद यांची नियुक्ती झाल्याने त्यांना खडतर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन महिने मुलाच्या घरी राहून त्याची भेट होऊ शकली नाही. दिवाळीच्या सुटीत परिवारासह नाशिक येथे भेटण्यास येणार असल्याचे त्यांना आई-वडिलांना सांगितले होते.त्यामुळे सोमवारी आई-वडील परत नाशिक येथे निघाले. दोन महिने राहूनही मुलाची भेट होऊ शकली नाही हे शल्य तर होतेच, परंतु देशसेवेसाठी आपला मुलगा लढत असल्याचा गर्व बाळगून मंगळवारी सायंकाळी खैरनार दाम्पत्य नाशिक येथे पोहचले. आणि बुधवारी सकाळी त्यांना मिलिंद शहीद झाल्याची वार्ता कळाली.ते ऐकून आईचे काळीज तुटले. वडिलांनी दु:ख सहन करीत धीरगंभीर होत प्रसंगाला सामोरे जाण्याचे ठरविले.दुसरीकडे पत्नी चंदीगड येथे होती. तेथून हवाईदलाच्या विशेष विमानाने पतीच्या पार्थिवासह पत्नी हर्षदा, मुलगी वेदिका आणि पुत्र कृष्णा हे ओझर विमानतळावर आले. तेथे भाऊ आणि इतर नातेवाईक होते. त्यांच्यासह सर्व परिवार लष्कराच्या वाहनाने नंदुरबारात आले.शहीद मिलिंदचे आई-वडील आणि इतर नातेवाइकांना पाहताच हर्षदा यांनी अनेक वेळापासून दाबून ठेवलेले आपले दु:ख मोकळे केले आणि एकच हंबरडा फोडला. आई, वडील, पत्नी, भाऊ यांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून तापीकाठही गहिवरला.उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांना अश्रूधारा लागल्या. तशाही परिस्थितीत घरी अंत्यसंस्काराचे सर्व विधी करण्यात आले. जेव्हा सजविलेल्या ट्रॅक्टरमधून शहीद मिलिंद यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली तेव्हा ट्रॅक्टरवरील शवपेटीजवळ बसलेला निरागस दोन वर्षाचा मुलगा कृष्णा आणि आठ वर्षांची मुलगी वेदिका यांच्याकडे पाहून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता. दु:ख व्यक्त करीत होता. या भावनेतूनच भारत माता की जय आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा आसमंतात दुमदुमत होत्या.नंदुरबार गावातील सुपुत्र देशसेवेसाठी कामी आला याचा गर्व आणि त्याला आलेले वीर मरण यामुळे निर्माण झालेले दु:ख अशा द्विधा मनस्थितीत राहूनही गावकºयांनी एकजुटीने अवघ्या दीड दिवसात अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केली. प्रत्येक घराने आपल्या परीने होईल तेवढी मदत करून आपल्या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला.नंदुरबारपासून २० किलोमीटर अंतरावर तापी काठावर असलेले बोराळे गाव. खैरनार कुटुंबाचे येथे चार ते पाच घरे. पैकी जवान मिलिंद खैरनार यांचे वडील वीज मंडळात नोकरीला असल्यामुळे व त्यांचे आजोबाही शिक्षक असल्यामुळे या कुटुंबाचे तसे गावोगावी वास्तव्य होते. असे असले तरी खैरनार परिवाराने आपल्या गावाशी, आपल्या मातीशी नाळ तोडली नव्हती. शहीद मिलिंद यांचे वडील नाशिकला स्थायिक झालेले, स्वत: मिलिंद देशसेवेसाठी विविध ठिकाणी राहणारे, भाऊ मुंबई पोलीस दलात सेवेत असे सर्व असतांना या कुटुंबाने सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम व कौटुंबिक कार्यक्रमानिमित्ताने गावी येणे कधी टाळले नाही. त्यामुळे ग्रामस्थांची त्यांच्याविषयी आत्मियता कायम होती.नंदुरबार : पुत्र गेल्याचे दु:ख आहेच, परंतु देशसेवेसाठी आपला पुत्र कामी आला याचा मोठा अभिमान आपल्याला असल्याचे सांगत दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा शहीद मिलिंद यांचे वडील किशोर खैरनार यांनी व्यक्त केली.सकाळपासूनच किशोर खैरनार यांच्या सांत्वनासाठी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील मंडळी येत होती. या वेळी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलतांना किशोर खैरनार यांनी सांगितले, देशासाठी आपल्या मुलाने बलिदान दिले. दहशतवाद्यांचा खात्मा करताना त्याला वीर मरण आले. पुत्र गेल्याचे दु:ख काय असते बापच जाणू शकतो. परंतु त्याही परिस्थितीत आपण उभे राहिलो. घरच्या लोकांना धीर दिला. मुलाला वीरमरण आले आहे. त्यामुळे दु:ख व्यक्त करताना अभिमानही बाळगा असे समजून सांगितले. सरकारने दहशतवादाची कीड समूूळ नायनाट करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी व अशा वीर जवानांचे होणारे नुकसान टाळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सून अर्थात शहीद मिलिंद यांच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घेत तिला उभे करावे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.साक्री : जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरा भागात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले भारतमातेचे वीरपुत्र मिलिंद खैरनार यांचे पार्थिव बोराळे (ता.नंदुरबार) येथे नेत असताना साक्री, जैताणे, पिंपळनेर येथील हजारो नागरिकांनी त्यांचे दर्शन घेत त्यांना अखेरची मानवंदना दिली.साक्रीशहीद मिलिंद खैरनार यांचे शिक्षण साक्रीतच झाले होते. त्यांचे पार्थिव आज ओझर विमानतळावरून साक्रीमार्गे नंदुरबारकडे नेण्यात येत होते. मिलिंद खैरनार यांचे साक्रीशी अतूट नाते होते. त्यामुळे साक्रीवासीयांनी सैन्य दलातील अधिकाºयांना काही वेळ थांबण्याची विनंती केली. अधिकाºयांनीही ती विनंती मान्य करीत वाहन पोलीस स्टेशनजवळ थांबविले. वीर जवान मिलिंद खैरनार यांच्या अंत्यदर्शनासाठी शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती. व्यावसायिकांनी काही वेळ आपले व्यवसाय बंद ठेवले होते. त्यांनी ज्या शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेतले, त्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ‘मिलिंद भाऊ अमर रहे’च्या घोषणा देत मानवंदना दिली. पिंपळनेर येथे खैरनार यांचे पार्थिव २ वाजता येथे पोहचल्यावर शालेय विद्यार्थ्यांनी ‘मिलिंद खैरनार अमर रहे’च्या घोषणा दिल्या. या वेळी पोलीस अधिकारी व परिसरातील ग्रामस्थांनी शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण केली.
आणि तापीकाठही गहिवरला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:22 AM
शहीद मिलिंद खैरनारवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : साश्रूनयनांनी निरोप; हजारो नागरिकांची उपस्थिती
ठळक मुद्देदेशप्रेमाच्या भावनेने गाव एकवटलेसाक्री व पिंपळनेरात अखेरची मानवंदनापुत्राला वीर मरण आल्याचा अभिमान - किशोर खैरनार