लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील व्यापारी आणि अतिक्रमण करणारे हॉकर्स यांच्यात मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नावाची धडकी भरली आहे. केव्हा वाहुळेंचे पथक येईल आणि कारवाई होईल, याची भिती अनधिकृत फेरीवाल्यांच्या मनात आहे. तर लॉकडाऊनच्या काळात दुकान उघडले तर लगेचच दंड होईल, याचीही भिती व्यापाऱ्यांच्या मनात आहे. पण शिस्तप्रिय अधिकाऱ्याने तातडीने धाऊन जात एका कुटुंबाला मदत केली आणि त्यासाठी किचन सोल्युशन्सचे दुकान पाच मिनिटे का होईना, पण उघडण्याची परवानगी ऐन लॉकडाऊनमध्ये दिली आहे.
जळगावातील व्यावसायीक कैलास कासार यांचे बाजारपेठेत भांड्यांचे दुकान आहे. त्यांचे नातेवाईक पुण्यात राहतात. ते संपुर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आहे. त्याचवेळी त्यांना तातडीने इलेक्ट्रिक इंडक्शनची गरज भासली. मात्र पुणे शहरही बंद आहे. त्यांनी त्यासाठी जळगावला कासार यांच्याकडे मदत मागितली. मात्र कासार हे देखीलदुकान उघडु शकत नव्हते. नातेवाईक आर्जवे करत होते. त्यामुळे कासार यांनी थेट उपायुक्त वाहुळेंना मेसेज करून पाच मिनिटे का होईना. पण दुकान उघडण्याची परवानगी मागितली. त्यावर वाहुळेंनी परिस्थिती जाणून घेत दुकान उघडु दिले. अन् त्या गरजेच्या वस्तु काढु दिल्या. या वस्तु एका मित्राच्या मार्फत कासार यांनी तातडीने पुण्याला पाठवल्या. वाहुळे यांनी तातडीने दिलेल्या परवानगीमुळे व्यापाऱ्यांनीही त्यांचे आभार मानले आहे.