‘बदरा घिर आए, ऋत है भीगी-भीगी’ या गीतातील त्याचप्रमाणे ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या अप्रतिम गीतातील तबला स्वस्थ बसू देई ना! बहिण म्हणाली, तुला ‘सामान्यज्ञानावर’ प्रश्नपत्रिका सोडवायची आहे का..., तिनं गीत, संगीताचा आनंद घेतला आणि मी शोधत राहिले हे उस्ताद अल्ला राखा, उस्ताद अहमद जान थिरकवा, पंडित सामता प्रसाद, पंडित किशन महाराज की पंडित आलोकनाथ मिश्रा? ... तिनं पुन्हा छेडलं, ‘तुला समजते सगळ्यांची शैली? फरक समजतो?’ मी म्हटलं, त्यातलं क, ख, ग, माहीत नाही पण ऐकल्यानंतर त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि अलाहिदा आनंद प्राप्ती होते...तबल्याचा इतिहास जाणून घेण्याची आवश्यकता नाही, पण हजारो वर्षापूर्वी ज्यांनी लेण्यांमध्ये मृदंग... डमरू सारखी वाद्यं कोरलीत, त्यांना सलाम करावा... एरवी अमीर खुसरो यांना तबल्याचा जनक मानतात. तब्ल- म्हणजे वाद्य, पखवाजचे दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली, असाही उल्लेख आढळतो... म्हणून म्हटलं जातं.---तोडा और तब बोला तबला...आपल्या अब्बाजानसारखा हादेखील तबलावादक बनू नये म्हणून अम्मीजान तबले लपवून ठेवत असे, पण सहा-सात वर्षांचा जाकिर ताट-वाट्या आणि चमचे घेऊन तबला वादनाचा आनंद घेत असे. अब्बाजान जागतिक पातळीवरचे कलाकार तसाच हा लेक पण. त्यांनी चित्रपटांना संगीत दिलं तर हा कुठं मागे राहणार? पूर्व-पश्चिम कलांचा संगम-दाक्षिणात्य आणि हिंदस्थानी तालवाद्यांची जुगलबंदी हिट अॅण्ड डस्ट, विएतनाम, अ टेलिविजन हिस्टरी, साज, मंटो, मिस्टर अॅण्ड मिसेस अय्यर, वनप्रश्थम.. अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.उस्ताद अल्ला राखा म्हणजे उस्ताद जाकिर हुसैन ह्यांचे अब्बूजान ए.आर.कुरेशी या नावानं चित्रपटांना संगीत देत. साधारण साठचं दशक असावं. बेवफा, आलमआरा, यादगार (१९४७), खानदान (१९५५), हातिमताई की बेटी, परवीन... असे अनेक! सकाळी ७.३० ते ८.०० या दरम्यान रेडिओ सिलोनवर त्यांची मी अनेक गाणी ऐकली अन् त्यांचा नवा परिचय मिळाला. ‘मेरी सूरत तेरी आँखे’ या चित्रपटात पं.समताप्रसाद आणि उ.अल्ला राखा यांचा विलोभनीय तबला बर्मनदा यांनी सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचविला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘पिया तोसे नैना लागे रे’ (चित्रपट- गाईड) या गीतात पंडित शिवकुमार शर्मा यांचा तबला असल्याचा उल्लेख आहे. पं.शर्मा हे संतुरवादक म्हणून सर्व परिचित आहेत. पण आरंभिक काळात ते तबला वादनात रस घ्यायचे असं म्हणतात.पद्मश्री, पद्मभूषण उस्ताद जाकिर हुसैन यांना मागे प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं! त्यांची तन्मयता आणि समर्पितता पाहिली. तबला वाजवता-वाजवता मध्येच विनोद पेरणं, कृष्ण राधेचा संवाद, दोन मित्रांमधला संवाद पेरणं इतकं सहज होतं की फक्त सलाम करावा त्यांच्या जादुई हाताला आणि म्हणावं ‘वाह उस्ताद’.‘साज’ (१९९८) हा चित्रपट पद्मभूषण सई परांजपे यांच्यामुळे जितका लक्षात राहतो तितकाच या चित्रपटाचे प्रमुख संगीत निर्देशक उस्ताद जाकिर हुसैन यांच्या पार्श्वसंगीतामुळे (कथानकाची मागणी म्हणून इतर तीन संगीतकारही होते) लक्षात राहतं ‘फिर भोर भई जागा मधुबन’ हे अप्रतिम चाल असलेलं गीत. गीतकार जावेद अख्तर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार लाभलेला. दोन सख्ख्या बहिणी मानसी आणि बंसी दोघी गायिका परंतु व्यावसायिक कला पातळीवर त्यांची भूमिका कशी टोकाची हे दर्शविणारा चित्रपट ‘साज’! यात उस्ताद जाकीर हुसैन यांनी संगीता समवेत भूमिकाही वठवलेली...‘साज’ चित्रपटानंतर उस्ताद जाकीर हुसैन यांनी नंदीता दास यांच्या ‘मंटो’ या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिल्याची नोंद आहे. १९९६ च्या अटलांटा आॅलिंपिक्सच्या उद्घाटन सोहळ्यासाठीची त्यांची वाद्यवृंद रचना श्रोत्यांच्या स्मरणात आहेच! सोलो, फ्यूजन, गायक-वादकांसमवेत तन्मयतेनं साथसंगत करणारा हा कलाकार स्वत:ची शैली जपणारा म्हणून कलाजगतात मान्यताप्राप्त आहे.साता समुद्रापलिकडे भारतीय संगीताचा पताका फडकविणाऱ्या या कलाकारास मानाचा मुजरा !-डॉ.उषा शर्मा, जळगाव
और तब बोला तबला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 4:57 PM