अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामाच्या नोंदी ठेवण्यासाठी मोबाईल पुरविण्यात आल्यानंतर, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या मोबाईलद्वारे अंगणवाडी सेविकांना कुटुंब व्यवस्थापन, दररोजचेे पोषणभरण, गृहभेट, घरपोच आहार, बालकांचे लसीकरण, मासिक-प्रगती अहवाल, दैनंदिन हजेरी वेळापत्रक आदी कामांचा अहवाल या मोबाईल मध्ये दिलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रशासनाला सादर करावा लागत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मुदतीत आपला दैनंदिन सादर करण्याच्या सुचना आहेत. मात्र, पुरेशा शिक्षणाचा अभाव आणि मोबाईलच्या हाताळणीबाबत पुरेसे प्रशिक्षण न देण्यात आल्यामुळे या अंगणवाडी सेविकांना चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. यावर मात करण्यासाठी या अंगणवाडी सेविका एकमेकांच्या विनंत्या करुन, आपले काम मार्गी लागत आहेत.
इन्फो :
या आहेत अडचणी :
ॲण्ड्राईड मोबाईल वापरतांना बऱ्याच महिलांमध्ये शिक्षणाच्या अभावामुळे मोबाईल वेगवेगळ्या प्रकारची अडचणी येत आहेत. तसेच रावेर, चोपडा, यावल या येथील काही डोंगराळ भागात रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे महिलांना मोबाईल मध्ये नोंदी भरतांना विलंब होत आहे.
इन्फो :
अंगणवाडी सेविकांना मोबाईल वरुन ही कामे करावी लागतात :
- गावांमध्ये ज्या गर्भधारणा झालेल्या महिला असतील, त्यांच्या घरी जाऊन त्यांची तब्येत, आहार, औषधी यांची काळजी घेण्याबाबत दैनंदिन कामाची नोंद करणे.
- सुरळीत बाळंतपणासाठी दैनंदिन आरोग्याची तपासणी, मार्गदर्शन व इतर बाबींची नोंद करणे.
-बाळंतपणानंतर मातांची व त्यांच्या बाळाची आरोग्य करुन तपासणी घेण्याबाबत नोंदी ठेवणे.
- संबंधित बाळाच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी विविध प्रकारच्या लसीकरणाच्या माहिती नोंद करणे.
- अंगणवाडी बालकांना शिकविण्यासह, त्यांच्या पोषण आहाराच्या वाटपाची नोंद ठेवणे.
- अंगणवाडीतील दैनंदिन बालकांची उपस्थितीची हजेरीपत्रक भरणे.
-गावातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यबाबत मुलींना व मातांना मार्गदर्शन करणे.
- शासनाच्या विविध कौटुंबिक योजनांचा लाभ मिळण्याबाबत घरोघरी जाऊन, माहिती व मार्गदर्शन करणे.